नितीश कुमारांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल! महिला डॉक्टरशी केलेल्या वर्तनावरून दंगल गर्ल अभिनेत्रीचा संताप
Zaira Wasim Slams Bihar CM Nitish Kumar Over Hijab Controversy : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यावरून आता नवा राजकीय आणि सामाजिक वणवा पेटला आहे. एका शासकीय कार्यक्रमात भर व्यासपीठावर एका मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब (नकाब) ओढल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांवर होत आहे.

नितीश कुमार यांच्या या कृतीनंतर राजकीय विरोधकांसह अनेक जण टीका करत आहेत. आरजेडीने नितीश कुमार यांचा हिजाब खेचल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया एक्स या अकाऊंटवर पोस्ट करत "नितीश कुमार यांना काय झाले आहे?
त्यांची मानसिक स्थिती दयनीय स्थितीत पोहोचली आहे की नितीश १०० टक्के संघवाले बनले आहेत?" अशी टीका केली. तर दुसरीकडे बॉलिवूडची माजी अभिनेत्री जायरा वसीम हिचा संतापही अनावर झाला. तिने थेट मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मर्यादांची आठवण करून देत 'बिनशर्त माफी' मागण्याचे आव्हान दिले आहे असे 'वनइंडिया हिंदी'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
बिहारमध्ये नुकताच एक नियुक्ती पत्र वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार एका मुस्लिम महिला आयुष डॉक्टरला नियुक्ती पत्र देत होते. व्हिडिओमध्ये दिसते की, पत्र देताना मुख्यमंत्र्यांनी त्या महिलेच्या डोक्यावरील आणि चेहऱ्यावरील हिजाब (नकाब) हाताने बाजूला केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू होते, मात्र या कृतीमुळे संबंधित महिला अत्यंत असहज, गोंधळल्यासारखी झाल्याचे दिसून आले.
यह क्या हो गया है नीतीश जी को?
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) December 15, 2025
मानसिक स्थिति बिल्कुल ही अब दयनीय स्थिति में पहुंच चुकी है या नीतीश बाबू अब 100% संघी हो चुके हैं?@yadavtejashwi #RJD #bihar #TejashwiYadav pic.twitter.com/vRyqUaKhwm
अभिनेत्री जायरा वसीमची रोखठोक प्रतिक्रिया
चित्रपटसृष्टी सोडल्यानंतरही सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या जायरा वसीमने या घटनेचा कडाडून निषेध केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, "महिलांची प्रतिष्ठा आणि मर्यादा यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ शकत नाही, विशेषतः जेव्हा विषय सार्वजनिक व्यासपीठाचा असतो." तिने पुढे म्हटले की, एका मुस्लिम महिलेच्या चेहऱ्यावरून अशा प्रकारे नकाब हटवणे हे अत्यंत असंवेदनशील आहे.
सत्तेत आहात, भान ठेवा - जायरा वसीम
सत्तेत बसलेल्या लोकांनी आपल्या मर्यादांचे भान ठेवले पाहिजे. कोणाचीही वैयक्तिक ओळख किंवा धार्मिक प्रतीकांचा असा अनादर स्वीकारार्ह नाही. जायरा वसीमने मुख्यमंत्र्यांनी संबंधित महिलेची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.
राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संताप
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वागण्याला 'महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा' असल्याचे म्हटले आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावरून नितीश कुमारांना घेरले असून, ही घटना महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी असल्याचे म्हटले आहे.
कोण आहे जायरा वसीम?
'दंगल' आणि 'सीक्रेट सुपरस्टार' सारख्या सुपरहिट चित्रपटांतून घराघरात पोहोचलेल्या जायरा वसीमने तिच्या करिअरच्या शिखरावर असताना अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता. मीडिया रिपोर्टनुसार, धार्मिक कारणास्तव तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला असला तरी, ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते मांडत असते.












Click it and Unblock the Notifications