प्रतीक गांधी कोण आहे? फुलेंच्या चित्रपटावर नेमका आक्षेप काय?
Phule movie controversy : अभिनेता प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांचा 'फुले' हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहते त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. दरम्यान चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे, ज्यामुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. आधी हा चित्रपट आज शुक्रवार 11 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, मात्र या चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
हा चित्रपट क्रांतिकारी ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक सुधारणा आणि संघर्षावर आधारित आहे. चित्रपटात प्रतीक गांधीने महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे तर पत्रलेखा यांनी सावित्रीबाई फुले यांची मुख्य भूमिका साकारत आहे.

फुले चित्रपट जातीवादाच्या वादात अडकला
प्रतीक गांधींचा फुले हा चित्रपट जातीवादाच्या वादात अडकला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. ब्राह्मण समाजाने यावर आक्षेप घेतला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, हा चित्रपटात एकांगी विचारसरणी दाखवली जात आहे, तसेच जातीवादाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दवे यांनी ब्राह्मण' समुदायाचे योगदान चित्रपटात दाखवावे अशी मागणी केली आहे.
काय आहे वाद ?
चित्रपटाबद्दल वाद वाढल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना अनेक बदल करण्याचे आदेशही दिले आहेत. विशेषतः, जातिव्यवस्थेचा उल्लेख करणारा व्हॉइसओव्हर काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटातून 'महार', 'मांग', 'पेशवाई' आणि 'मनुस्मृती जातिव्यवस्था' हे शब्द काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली
महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. चित्रपट दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, 'प्रत्येक चित्रपटात चित्रपट स्वातंत्र्य घेतले जाते, प्रत्येक दिग्दर्शक चित्रपटात दाखवल्याप्रमाणे स्वातंत्र्य घेतो.' दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्यासोबत निर्माते अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा आणि सह-निर्माते रोहन गोडांबे होते.
छगन भूजबळ काय म्हणाले ?
दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. बैठकीनंतर छगन भुजबळ म्हणाले, 'दिग्दर्शक आणि इतर गटाने खूप मेहनत घेतली असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहावा, महात्मा फुले यांनी उत्तम काम केले आहे, केवळ देशातच नाही तर हा चित्रपट संपूर्ण जगापर्यंत पोहोचला पाहिजे, असं म्हटलं आहे'
कोण आहे प्रतीक गांधी ?
सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेल्या 'स्कॅम 1992' या वेब सिरीजमध्ये उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे प्रतीक गांधी प्रसिध्दीझोतात आला. या वेब सिरीजमध्ये प्रतीक गांधी यांनी हर्षद मेहताची भूमिका साकारली होती. ही वेब सिरीज प्रचंड हिट झाली आणि लोकांनी प्रतीक गांधीच्या अभिनयाचे कौतुक केले. या वेब सिरीजमधून प्रतीक गांधी यांना एक नवीन ओळख मिळाली.
प्रतीक गांधी यांचा जन्म 7 जुलै 1980 रोजी गुजरातमधील सुरत येथे झाला. प्रतीक गांधी यांचे आई आणि वडील दोघेही शिक्षक आहेत. प्रतीक गांधी यांच्या आईचे नाव रीता गांधी आहे. प्रतीक गांधी यांना पुनीत गांधी नावाचा एक भाऊ देखील आहे. प्रतीक गांधी यांनी आपले शालेय शिक्षण सुरतच्या भुलका भवन शाळेतून पूर्ण केलं आहे. प्रतीकला डॉक्टर व्हायचे होते, पण कमी गुणांमुळे तो वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू शकला नाही.
प्रतीक गांधीला अभिनयाची प्रचंड आवड असल्याने ते दिवसा काम करायचा आणि संध्याकाळी रंगभूमीवर काम करायचा. रंगभूमीवर काम केल्याने त्याच्या अभिनयात खूप सुधारणा झाल्या. प्रतीक गांधी त्याच्या अभिनय कारकिर्दीत भामिनी ओझाच्या प्रेमात पडले. त्यानंतर 2009 साल प्रतीक गांधी आणि भामिनी ओझा यांनी लगीनगाठ बांधली. प्रतीक गांधींप्रमाणेच भामिनी ओझा देखील अभिनय क्षेत्राशी संबंधित आहे. भामिनी ओझाने टेलिव्हिजन आणि थिएटरमध्ये काम केलेलं आहे.












Click it and Unblock the Notifications