जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन, मराठी चित्रपट सृष्ट्रीतील त्यांचा प्रवास वाचा
Dr Vilas Ujwane Passesaway : मराठी नाट्य, मनोरंजनसृष्टीतील अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं शुक्रवारी दुपारी निधन झालं आहे. आज (ता.5) एप्रिल रोजी शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. उजवणे यांच्या पश्चात पत्नी अंजली आणि मुलगा कपिल आहे. डॉ. उजवणे यांचे मुळ गाव हे नागपूर आहे. त्यांनी नागपूरात बीएएमएसचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी नाटयक्षेत्रात पाऊल टाकले. महाविद्यालयीन नाटकासह त्यांनी राज्य नाटय स्पर्धेत आपला ठसा उमटविला होता.
भारदस्त आवाजाची देणगी, संवाद शैलीचा टायमिंग लाभलेले जेष्ठ अभिनेता म्हणून डॉ. उजवणे यांनी आपली ओळख निर्माण केली होती. 'वादळवाट' या गाजलेल्या मालिकेसह अनेक नाटके, दूरचित्रवाणीच्या मालिका व विविध चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका केल्या होत्या. डॉ. उजवणे हे मुळचे नागपूरचे असल्याने ते अधून-मधून नागपूर येत असतं. नागपूरमधील कलावंत, दिग्गदर्शक, निर्माते तसेच चित्रपट सुष्टीतील लोकांशी त्यांचे जवळचे संबंध होते.

डॉ. विलास उजवणे यांनी मराठीतील 'चार दिवस सासूचे', 'दामिनी, 'वादळवाट' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी चित्रपटसुष्टीतील कलाकारांसह राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट लिहित विलास उजवणे यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
अभिनेते मिलिंद गवळी यांची भावनिक पोस्ट
अभिनेते मिलिंद गवळी यांनी विलास उजवणे यांच्या आठवणीत भावुक पोस्ट लिहिली आहे. मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "डॉक्टर विलास उजवणे. अतिशय गोड स्वभावाचा उमदा कलाकार काळाच्या पडद्याआड निघून गेला. आज खूप मन भरून आलं आहे, त्यांच्याबरोबर केलेल्या चित्रपटातलं काम, सगळं डोळ्यासमोरून जातंय. त्यांचा उत्तम अभिनय आठवतोय. त्यांच्याबरोबर मारलेल्या मनमोकळ्या गप्पा आठवताय. त्यांचं खळखळून हसणं आठवतंय. खूपच छान स्वभावाचे होते डॉक्टर विलास उजवणे. खरंतर पंधरा-वीस वर्षे मी त्यांच्या संपर्कात नव्हतो."
"पण काही महिन्यांपूर्वी, मी माझ्या डीएसएलआर कॅमेराने आमच्या शूटिंगच्यादरम्यान क्लिक केलेले त्यांचे फोटो मला अचानक सापडले आणि मी ते त्यांना व्हॉट्सअपवर पाठवले. त्यानंतर आमचं फोनवर सुद्धा बोलणं झालं. त्यांचे मी काढलेले फोटो बघून त्यांना खूप आनंद झाला होता. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांच्या आजाराबद्दल कळलं.
ब्रेन स्ट्रोक झाला होता, हृदयाची थोडी समस्या आहे. पण, आता मी बरा आहे. आपण लवकरच भेटू या आणि एकत्र काम करूया. मात्र, मालिका करणं आता जमणार नाही . आपण एखादा सिनेमा परत करू या. पण आमची भेट काही झाली नाही. परत एकत्र काम करायचं राहून गेलं आणि आज ही बातमी ऐकून मनाला खूप धक्का बसला," असं मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"एका कलाकाराचं आयुष्य किती नाजूक अस्तं, शरीरात काही बिघाड झाला, तर पुन्हा पूर्ववत येणं किती कठीण जातं, पुन्हा तसंच पूर्वीसारखं काम करणं कठीण जातं,अवघ्या वयाच्या 62 व्या वर्षी डॉक्टर उजवणे आपल्यातनं निघून गेले, माझ्यासमोर अनेक माझे उत्तम मराठी सहकार कलाकार शरीराने साथ न दिल्यामुळे फार लवकर निघून गेले, अतुल परसुरे 57, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे 54, रमेश भाटकर, कुलदीप पवार, सतीश तारे 48.या सगळ्यांमध्ये अजून भरपूर काम करायची जिद्द होती, इच्छा होती, भरभरून टॅलेंट होतं, पण शरीराने साथ दिली नाही, डॉक्टर विलास उजवणे यांची पण भरपूर काम करायची इच्छा राहून गेली. यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर हे मोठे संकट सहन करण्याचे बळ देवो. शक्ती देवो..."
खा. अमोल कोल्हेंकडून दुःख व्यक्त
जेष्ठ अभिनेते विलास उजवणे यांच्या निधनानंतर अभिनेते आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. खा. कोल्हे यांनी सोशल मिडिया पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या खडतर काळात मला अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे.
समोर आलेल्या आजारांचा त्यांनी अतिशय कणखरपणे सामना केला, या लढ्यात त्यांच्या पत्नी अंजली वहिनी यांनीही त्यांना खंबीर साथ दिली. ही झुंज अखेर थांबल्याने कला विश्वातील एक अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना."
अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या खडतर काळात मला अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 4, 2025
समोर आलेल्या आजारांचा त्यांनी अतिशय कणखरपणे सामना केला, या लढ्यात त्यांच्या पत्नी अंजली वहिनी यांनीही त्यांना खंबीर साथ… pic.twitter.com/oQNmv39LWF
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाहिली श्रद्धांजली
राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून डॉ. विलास उजवणे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'ज्येष्ठ मराठी अभिनेते व रंगकर्मी डॉ. विलास उपाख्य नाना उजवणे यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि दुःखद आहे.
ज्येष्ठ मराठी अभिनेते व रंगकर्मी डॉ. विलास उपाख्य नाना उजवणे यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि दुःखद आहे.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 4, 2025
नागपूरच्या रंग स्वानंद नाट्यसंस्थेतून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. अनेक मराठी नाटके, मालिका व चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे रसिकांच्या मनावर ठसा… pic.twitter.com/G88IbExMb8
नागपूरच्या रंग स्वानंद नाट्यसंस्थेतून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. अनेक मराठी नाटके, मालिका व चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम् शांती."












Click it and Unblock the Notifications