‘तारक मेहता' शोमधून जेठालाल आणि बबिताचा अचानक गायब होणं,,,अन् प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण
भारतातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या विनोदी मालिकांपैकी एक म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. सध्या या मालिकेचा कथानकाचा ट्रॅक थोडासा रहस्यमय आणि वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या 'भूतनी' ट्रॅकमध्ये शोतील काही महत्त्वाचे पात्रे विशेषतः जेठालाल आणि बबीता जी हे प्रेक्षकांच्या नजरेस पडलेले नाहीत. यामुळे सोशल मीडियावर चर्चांचा भडका उडाला आहे. अनेकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, दोघांनीही शोला रामराम ठोकला असावा.

शोमधील गैरहजेरीवर प्रेक्षकांची चिंता, निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण
जेठालाल (दिलीप जोशी) आणि बबिता जी (मुनमुन दत्ता) हे दोघंही सध्या प्रेक्षकांच्या आवडीचे पात्र आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीने चाहत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, शोच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की या दोघांनी मालिका सोडलेली नाही.
ते म्हणाले की, बबीता जी अय्यरसोबत महाबळेश्वरला सुट्टीसाठी गेली आहे, तर जेठालाल एका महत्त्वाच्या व्यावसायिक प्रवासासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे ते सध्या कथानकातून काही वेळासाठी बाहेर आहेत, मात्र शोमध्येच आहेत. याशिवाय डॉक्टर हत्ती आणि त्यांची पत्नी मिसेस हत्ती देखील या ट्रॅकमध्ये दिसलेले नाहीत, ज्यामुळे गोकुळधाम सोसायटी काहीशी रिकामी वाटत आहे.
नवीन पात्र चकोरीची एंट्री, पोपटलालच्या प्रेमकथेचं नवं पान
दरम्यान, या गूढपणात एक नवा ट्विस्ट म्हणजे शोमध्ये 'चकोरी' या नव्या पात्राची एंट्री झाली आहे. मेकर्सनी नुकताच एक प्रोमो रिलीज केला आहे ज्यात पोपटलाल आणि चकोरी विहिरीपाशी बोलताना दिसतात. चकोरीच्या काही गोष्टी पोपटलालच्या आवडीनिवडींसोबत जुळतात आणि पोपटलाल तिच्या बोलण्यात हरवून जातो.
परंतु ही भेट तितकी सहजसोपीदेखील नाही, कारण गोकुळधामच्या महिलांची एक टीम पोपटलालला शोधत तिथे पोहोचते आणि चकोरी घाबरते. त्यामुळे या नव्या पात्रामुळे कथानकात रोमांचक वळण मिळण्याची शक्यता आहे.
शो सोडण्याच्या अफवा निराधार, प्रेक्षकांना दिलासा
एकंदरीत, जेठालाल आणि बबीता जी यांच्या जाण्याच्या अफवा फोल ठरल्या आहेत. ते दोघंही अद्याप मालिकेचा भाग आहेत आणि लवकरच पुन्हा त्यांच्या नेहमीच्या शैलीत प्रेक्षकांना हसवत परततील, अशी अपेक्षा ठेवण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications