Sushant singh rajput : 'निव्वळ देखावा'! सुशांतच्या कुटुंबाचा CBI रिपोर्टवर आक्षेप; 'हा' निर्णय घेणार
Sushant singh rajput family rejects cbi closure report : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाला (Sushant Singh Rajput Death Case) एक मोठे वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेल्या 'क्लोजर रिपोर्ट'वर सुशांतच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी हा अहवाल 'निव्वळ देखावा' असल्याचे म्हटले आहे. या 'फ्लिम्सी' रिपोर्टला लवकरच न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.
सीबीआयने चार वर्षांहून अधिक काळ चाललेल्या तपासानंतर रिया चक्रवर्ती किंवा इतरांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचा निष्कर्ष काढला होता. सुशांतच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनाही सीबीआयने फेटाळले आहे.

सीबीआयच्या अहवालातील मुख्य निष्कर्ष
फिल्मी बीटनुसार, सीबीआयने दाखल केलेला हा रिपोर्ट हिंदुस्तान टाइम्सने ॲक्सेस केला आहे. यानुसार रिया चक्रवर्ती किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा पुरावा आढळला नाही. सुशांत रिया चक्रवर्तीला आपल्या 'कुटुंबाचा भाग' मानत असल्याचे अहवालात नमूद आहे. सुशांतच्या मालमत्तेचा रियाने गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा सीबीआयला मिळाला नाही. ८ ते १४ जून २०२० दरम्यान (सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यूच्या काळात) त्याच्यासोबत आरोपींपैकी कोणीही उपस्थित नव्हते. या काळात सुशांतने फक्त १० जून रोजी शोविक चक्रवर्तीशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला होता.
कुटुंबीयांचा 'तपासावर' गंभीर आक्षेप
फिल्मी बीटनुसार, सुशांतचे कुटुंबीय मात्र या निष्कर्षांवर समाधानी नाहीत. त्यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील वरुण सिंह यांनी सीबीआयच्या अहवालावर जोरदार टीका केली आहे. वकील वरुण सिंह म्हणाले, "हा निव्वळ देखावा आहे. जर सीबीआयला खरोखर सत्य बाहेर काढायचे असते, तर त्यांनी चॅट्स, तांत्रिक रेकॉर्ड, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय रेकॉर्डसह सर्व सहायक कागदपत्रे अहवालासोबत सादर केली असती. आम्ही या क्लोजर रिपोर्टविरुद्ध न्यायालयात प्रोटेस्ट याचिका दाखल करू, कारण हा अहवाल अत्यंत निकृष्ट आणि वरवरच्या तपासावर आधारित आहे."
सीबीआयच्या अहवालात चुकीच्या पद्धतीने ताब्यात ठेवल्याचे आरोपही फेटाळले आहेत. रिया आणि तिचा भाऊ ८ जून रोजी सुशांतचे घर सोडून गेले, तेव्हा त्यांनी फक्त एक ॲपल लॅपटॉप आणि सुशांतने दिलेले एक घड्याळ यांसारख्या वैयक्तिक वस्तू घेतल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
आर्थिक नोंदीवर प्रश्नचिन्ह
सीबीआयने सुशांतचे आर्थिक व्यवहार त्याच्या चार्टर्ड अकाउंटंट आणि वकिलांनी पाहिले होते, असे म्हटले आहे. मात्र, वरुण सिंह यांनी या अहवालाला 'कमजोर' म्हटले आहे. केवळ खात्यातून पैसे काढले नाहीत, असे सांगणे पुरेसे नाही; पडताळणीसाठी बँक स्टेटमेंट देणे आवश्यक आहे, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. बिहार आणि मुंबईत देशभरात खळबळ माजवणाऱ्या या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी पाटणा न्यायालयात होणार आहे. सुशांतच्या कुटुंबाने न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.












Click it and Unblock the Notifications