मोठी बातमी..! 'पुष्पा-2'च्या अल्लू अर्जूनला अटक; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली. 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या प्रीमिअर शो दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात, ही अटक करण्यात आली. या गदारोळात एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली.

काय होते नेमके प्रकरण
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा-२ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा प्रिमिअर शो 4 डिसेंबरला संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी संध्या थिएटर परिसरात प्रेक्षकांची तुडूंब गर्दी जमली होती. या गर्दीला सावरताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. याच गर्दीत चेंगराचेंगरी होऊन, एका ३५ वर्षिय महिलेचा मृत्यू झाला होता. थिएटरमधील चेंगराचेंगरीत एम. रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.
अल्लूवर दाखल होता गुन्हा
या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जूनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात बुधवारी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2'च्या प्रिमिअर शो दरम्यान चेंगराचेंगरीत श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणात दाखल केलेला एफआयआर रद्द करावा, अशी मागणी त्याने केली. या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी केली अटक
या घटनेनंतर 5 डिसेंबरला हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मृत महिलेच्या कुटुंबीयांनीही अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी थिएटर मालक, थिएटरचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरच्या खालच्या बाल्कनीचे प्रभारी या तीन जणांना अटक केली. तर अल्लू अर्जुनने एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल करत याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती. याच प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची माहिती काही प्रसार माध्यमांनी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications