शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला कायदेशीर कचाट्यात अडकला, जाणून घ्या संपूर्ण वाद
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला नूतनीकरणासाठी सज्ज आहे. असे म्हटले जात आहे की अभिनेता आणि त्याचे संपूर्ण कुटुंब या काळात मन्नतच्या बाहेर राहतील जेणेकरून नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू होईल. पण त्याआधीच शाहरुखचा बंगला कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
मन्नतच्या नूतनीकरणात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत एका सामाजिक कार्यकर्त्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) कडे संपर्क साधून कामाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. रिपोर्टनुसार सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी एनजीटीमध्ये शाहरुख खान आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए) वर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली आहे.

बार आणि बेंचच्या म्हणण्यानुसार संतोष दौंडकर यांचा असा दावा आहे की, मन्नतच्या नूतनीकरण आणि विस्तारासाठी मंजुरी देण्यासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनकडून आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. तसेच सुपर स्टार शाहरुखने या नियमांचे उल्लंघन केले आहे.
मन्नत ही ग्रेड-III वारसा रचना आहे. म्हणजेच कोणतेही नूतनीकरण किंवा बांधकाम करण्यापूर्वी योग्य परवानगी आवश्यक आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, शाहरुख खान त्याच्या सहा मजली बंगल्यात आणखी दोन मजले जोडण्याची योजना आखत आहे. याचिकेत असाही आरोप करण्यात आला आहे की, शाहरुख खानने कथितपणे 12, 1BHK बेडरूमच्या फ्लॅटचे विलीन करून ते त्याच्या वैयक्तिक बंगल्यात रूपांतरित केलं आहे.
एनजीटीने आता दौंडकर यांना त्यांच्या आरोपांना समर्थन देण्यासाठी ठोस पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. न्यायिक सदस्य दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, "जर या प्रकल्पात नियमांचे उल्लंघन झाले असेल तर याचिकाकर्त्याने चार आठवड्यांच्या आत त्याचा पुरावा सादर करावा लागेल. जर असे केले नाही तर हे अपील स्वीकृतीच्या टप्प्यावरच फेटाळले जाईल." मिळालेल्या माहितीनुसार एनजीटी या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी करणार आहे.












Click it and Unblock the Notifications