संजय कपूर यांचा मृत्यू कसा झाला, पोलिस अहवालात झाला खुलासा, आता त्यांची आई काय करणार?
sanjay kapoor death mystery : प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी निधन झाले. संजय कपूर यांच्या अचानक मृत्यूने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांचा मृत्यू इंग्लंडमध्ये पोलो खेळताना झाल्याचे वृत्त माध्यमांत आले होते.
पोलो खेळताना मधमाशी गिळल्याने हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचेही काही वृत्तांत म्हटले होते. पण आता त्यांच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर एक वेगळेच सत्य समोर आले आहे.

संजय कपूर यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे ब्रिटिश पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्या कार्यालयाने शेअर केला आहे.
संजय कपूर यांच्या मृत्यूला नैसर्गिक मृत्यू म्हणणाऱ्या या अहवालावर त्यांची आई राणी सुरिंदर कपूर यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच आपल्या मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले होते आणि ब्रिटिश पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली होती.
30,000 कोटींच्या कंपनीवरील वाद
संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या सोना ग्रुप या ३०,००० कोटींच्या कंपनीवरही वाद निर्माण झाला आहे. राणी कपूर यांनी २४ जुलै २०२५ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाला पाठवलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
त्यांनी म्हटले आहे की, 'जेव्हा कुटुंब शोकात होते, तेव्हा काही लोकांनी कंपनीची सूत्रे हाती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संजय कपूर यांचा मृत्यू सुनियोजित कटाचा भाग असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.
संजय यांच्या निधनानंतर लगेचच जेफ्री मार्क ओव्हरली यांची कंपनीच्या अध्यक्षपदी घाईघाईने निवड करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला आहे. हा निर्णय कुटुंबाच्या संमतीशिवाय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सुरुवातीला काही माध्यमांनी संजयची पहिली पत्नी करिश्मा कपूर या कंपनीवर हक्क सांगू शकते असा दावा केला होता. पण नंतर हे स्पष्ट झाले की करिश्माचा या वादाशी काहीही संबंध नाही. तिला फक्त आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे.
राणी कपूर या पोलिस अहवालावर काय पाऊल उचलतात आणि कंपनीच्या संचालक मंडळाच्या निर्णयाविरोधात त्यांची पुढील भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications