झी स्टुडिओची मोठी घोषणा, रतन टाटांवर येणार चित्रपट; मिळणारा नफा सामाजिक कार्यासाठी होणार दान
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे गुरुवारी निधन झाले. झी इंटरटेनमेंटचे सीईओ पुनित गोयंका यांनी टाटांचे प्रेरणादायी समाजकार्य पाहता, त्यांच्या जिवनावर आधारीत चरित्रात्मक चित्रपट काढण्याची घोषणा केली. टाटा यांचे कार्य भारतीयांच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि कार्य पुढच्या पिढ्यांना समजावे, यासाठी हा चित्रपट करण्याचा मानस, गोयंका यांनी व्यक्त केला. या चित्रपटातून भारताच्या अर्थव्यवस्थेतील स्व. रतन टाटा यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर आणि जगावर त्यांनी केलेल्या सकारात्मक प्रभावावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
झी ने वाहिली रतन टाटा यांना श्रद्धांजली
या चित्रपटाविषय झी ने माहिती दिली. गोयंका म्हणाले की, रतन टाटा यांचे संपूर्ण आयुष्यच उल्लेखनीय होते. त्याचे काम हे भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी होते. विशेषत: तरुणांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांच्यावर चित्रपट करण्याचा प्रस्ताव आम्ही समोर ठेवला आहे. झीचे चेअरमन आर. गोपालन म्हणाले, "टाटा यांची उणीव भारताला भासणार आहे. टाटाच्या सर्व उद्योगांचे कर्मचारी सध्या दुःखात आहेत.

आम्हाला वाटते की हा चित्रपट संपूर्ण जगावर सकारात्मक प्रभाव पाडेल. आम्ही त्याच्या कथेला जिवंत करण्याचा नक्कीच प्रयत्न करु. प्रेक्षकांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू. चीफ बिझनेस ऑफिसर उमेश बन्सल यांनीही या चित्रपटाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, "रतन टाटा यांच्या जीवनावरील पूर्ण लांबीच्या डॉक्युमेंटरी/चरित्रात्मक चित्रपटावर काम करताना आम्हाला सन्मान आणि अभिमान वाटतो. अशा महान व्यक्तिमत्वाचा व वारसा मोठ्या पडद्यावर दाखविणे, हे आपले कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. त्यांच्या जीवनाचे चित्रिकरण योग्य ताकदीने करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही."
कुटुंबाच्या परवानगीनंतर सुरु होईल चित्रीकरण
झी ने मांडलेला हा प्रस्ताव टाटा कुटुंबाच्या होकाराच्या प्रतीक्षेत आहे. टाटा कुटुंबियांनी या चित्रपटास हिरवा कंदील दिल्यानंतर या चित्रपटाचे शुटींग सुरु होईल. या चित्रपटातून मिळणारा नफा सामाजिक कारणांसाठी दान करण्याची आणि गरजूंना मदत करण्याची योजनाही झी स्टुडिओने आखली आहे. हा चित्रपट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची तयारीही झीने सुरु केली आहे. जगातील 190 पेक्षा जास्त देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झी स्टुडीओच्या माध्यमातून केला जाणार आहे, अशी माहितीही झी मीडियाचे सीईओ करण अभिषेक सिंग यांनी दिली.












Click it and Unblock the Notifications