रजनीकांत यांचा 'कुली' धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज: जाणून घ्या बजेट ते तिकीट दरांपर्यंत सर्व काही.!
Rajinikanth Coolie budget : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'कुली' बॉक्स ऑफिसवर दमदार पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. त्यांचा मागील चित्रपट 'वेट्टाय्या'ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पण, 'कुली'ची क्रेझ पाहता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे.
14 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्याच्या ॲडव्हान्स बुकिंगने आधीच 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाबद्दल बजेट, स्टारकास्टची फी आणि तिकिटांच्या किमतीबद्दल देखील चर्चा होऊ लागली आहे. चला तर याविषयी जाणून घेऊया...!

बजेट, स्टारकास्ट अन् त्यांचे मानधन!
चित्रपटाचे बजेट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या या चित्रपटाचे बजेट सुमारे ३५० कोटी रुपये आहे.
- रजनीकांत : सुपरस्टार रजनीकांत यांनी या चित्रपटासाठी तब्बल २०० कोटी रुपये मानधन घेतले आहे.
- नागार्जुन: खलनायकाच्या भूमिकेसाठी नागार्जुन यांना १० कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
- सत्यराज आणि उपेंद्र: या दोघांना प्रत्येकी ५ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.
- श्रुती हासन: त्यांना या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
- पूजा हेगडे: 'मोनिका' या आयटम साँगसाठी पूजा हेगडे यांना ५ कोटी रुपये मिळाले आहेत.
- आमिर खान: या चित्रपटात आमिर खान 15 मिनिटांच्या कॅमिओमध्ये दिसणार आहे आणि विशेष बाब म्हणजे त्याने यासाठी कोणतेही मानधन घेतले नाही.
'कुली'चे ॲडव्हान्स बुकिंग आणि तिकिटांचे दर
'कुली' चित्रपटाची क्रेझ खूप मोठी आहे. त्यामुळे, थिएटर मालकांनी तिकिटांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत.
ॲडव्हान्स बुकिंग
सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या वीकेंडसाठीच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
ओपनिंग डे अंदाज
व्यापार विश्लेषक कादेल यांच्या मते, 'कुली' पहिल्या दिवशी भारतात 80 ते 90 कोटी रुपये आणि जगभरात 155 ते 165 कोटी रुपये कमवू शकतो.
तिकिटांचे दर
बंगळुरू आणि चेन्नईमध्ये मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाचे तिकीट 800 ते 2000 रुपये पर्यंत विकले जात आहे. बुकमायशोवर सर्वात स्वस्त तिकीट 500 रुपये आहे. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, चेन्नईमध्ये तर तिकिटांची काळ्याबाजारात 4500 रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
उपमुख्यमंत्री स्टॅलिन काय म्हणाले?
तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांनी रजनीकांत यांना त्यांच्या 50 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल शुभेच्छा देत 'कुली' हा एक शक्तिशाली आणि मनोरंजक चित्रपट असल्याचे म्हटले आहे. त्यांना विश्वास आहे की हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकेल.
उमर संधू यांचा रिव्ह्यू
स्वत:ला परदेशी सेन्सॉर बोर्डाचा सदस्य म्हणवून घेणाऱ्या उमर संधू यांनी चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 'कुली'ला 'वन मॅन शो' असे म्हटले असून, रजनीकांतच्या अभिनयाचे खूप कौतुक केले आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, चित्रपटाची कथा आणि पटकथा सरासरी असली तरी क्लायमॅक्स आणि शेवटची 20 मिनिटे ही चित्रपटाचा आत्मा आहेत.
'कुली' हा एक गँगस्टर ड्रामा असून, यात रजनीकांत यांच्यासोबत नागार्जुन, आमिर खान, सत्यराज, श्रुती हासन आणि इतर अनेक कलाकार आहेत. आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे 14 ऑगस्टनंतर स्पष्ट होईल.












Click it and Unblock the Notifications