Raid 2 : अजय देवगणपेक्षा रितेश देशमुखचीच होतेय चर्चा; अभिनयात दोघांपैकी कोण सरस? वाचा
अजय देवगणचा 'रेड-२' नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात मराठमोळ्या रितेश देशमुखने साकारलेल्या खलनायकाच्या भुमिकेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तर 'मैदान', 'औरों में कहां दम था', 'सिंघम अगेन', 'नाम' आणि 'आझाद' यांसारखे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अभिनेता अजय देवगणने पुन्हा एकदा 'रेड 2' द्वारे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केलाय. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

काय आहे कथानक?
या चित्रपटात अजय देवगणने पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकारी अजय पटनायकची भूमिका साकारली आहे. अजय पटनायक या आयकर विभागातील प्रामाणिक अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप होतो. त्याची भोजला बदली होते. तिथला स्थानिक राजकारणी दादाभाई (रितेश देशमुख) जनतेमध्ये लोकप्रिय असतो. परंतु त्याच्यात अजयला काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो. त्यानंतर तो त्याच्या घरी, कार्यालयात छापा टाकतो. यानंतर दोघांमध्ये होणारी खडाजंगी या चित्रपटात पहायला मिळते.
कसा जमलाय चित्रपट?
दिग्दर्शक राज कुमार गुप्ता हे 'नो वन किल्ड जेसिका' सारख्या थ्रिलर चित्रपटासाठी ओळखले जातात. 'रेड 2'मध्येही त्यांनी तशीच दमदार कामगिरी केलीय. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संपूर्ण वेळ प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरल्याचं सांगितलं जातंय. परंतु तरीही पहिल्या रेडसारखा चित्रपट नक्कीच नाही. पूर्वार्धात या चित्रपटातील कथानकात ट्विस्ट अँड टर्न्स दिसतात. परंतु तो हिट या कॅटेगिरीत मोडणारा चित्रपट नसल्याचं समिक्षकांचं मत आहे.
रितेशने खाल्ला भाव
रितेश देशमुखने खलनायकाच्या भूमिकेत जबरदस्त काम केलंय. शिवाय यशपाल शर्मा, अमित सियाल आणि बृजेंद्र काला यांनीसुद्धा विशेष छाप सोडली आहे. चित्रपटात रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक आणि अजयच्या बॉसच्या भूमिकेतील रजत कपूर यांनीही उल्लेखनीय काम केलं. अमित त्रिवेदीच्या बॅकग्राऊंड म्युजिकची योग्य साथ या चित्रपटाच्या गतीला मिळते. जवळपास सव्वा दोन तासांचा हा चित्रपट 'परफेक्ट फॅमिली वॉच' आहे. या चित्रपटात अजय देवगणपेक्षा रितेशच्या कामाचीच जास्त चर्चा होऊ लागली आहे.












Click it and Unblock the Notifications