हॉरर चित्रपट “मुंज्या”चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
Mumbai - कोकणात चित्रित झालेला आणि मराठमोळ्या कलाकारांनी सजलेला "मुंज्या" हा हिंदी सिनेमा 7 जूनपासून जगभरात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कल्ला करण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच या सिनेमात दम आहे, अशी सर्वांचीच खात्री झाली होती.
त्यामुळे पदार्पणाच्या दिवशीच हा चित्रपट कोटीचा पल्ला गाठेल, अशी आशा होती. मात्र पहिल्याच दिवशी चित्रपटाने 4 कोटींचा गल्ला जमवून धमाल उडवून दिली आहे.

सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आदित्य अजय सरपोतदार यांनी मुंज्या ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ज्या Maddock films प्रोडक्शन ने या सिनेमाची निर्मिती केली आहे त्या प्रोडक्शनने आता पर्यंत लव्ह आज कल, कॉकटेल, मिमी, स्त्री, तेरी बातो मे ऐसा उलझा जिया, जरा हटके जरा बचके, बाला, बदलापूर, मर्डर मुबारक, सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ, चोर निकल के भागा, सास बहु और फ्लेमिंगो, शिद्दत, लुका छुपी, भेडिया, अग्रेजी मिडीयम अश्या अनेक सुपरहिट बॉलिवूड सिनेमांची निर्मिती केली आहे.
कोण आहे प्रमुख भूमिकेत
मुंज्या ह्या सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेता अभय वर्मा, अभिनेत्री शर्वरी वाघ, अभिनेत्री मोना सिंग, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, दक्षिणेतील अभिनेता सत्यराज, रीमा चौधरी, रिचर्ड जॉन, रसिका वेंगुर्लेकर अशी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. स्टार कास्ट मध्ये मराठी नावांचा चांगलाच भरणा आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटाला बहुतेक सर्वच मानाकन एजन्सीजनी चार स्टार दिले आहेत. अनेक वर्षानंतर हॉरर कॉमेडी प्रेक्षकांना अनुभवायला मिळते आहे.
कॅमेरामन सौरभ गोस्वामी, लेखन निरेन भट, प्रोडक्शन डिझाईन सुभ्रातो चक्रवर्ती, कला दिग्दर्शन पल्लवी पेठकर, कार्यकारी निर्माता संजीव मिश्रा आणि श्रद्धा थोरात, लाईन प्रोड्युसर (मुंबई) राजदीप गुप्ता, लाईन प्रोड्युसर (कोकण) साईनाथ जळवी यांनी केले आहे..या सिनेमाचं चित्रीकरण कोकणातील गुहागर, कुडाळ, सावंतवाडी, खवणे बीच, मुणगी गावात झाले आहे
मिस्टर अँड मिसेस माहीला मुंज्याने टाकले मागे
शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा पहिल्या शोला ११ % खुर्च्या भरलेल्या होत्या, मात्र संध्याकाळी हे प्रमाण ३८ टक्क्यांवर गेले. माउथ पब्लिसिटीचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झालेला दिसून आला. गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या "मिस्टर अंड मिसेस माही" या चित्रपटाला "मुंज्या"ने मागे टाकले आहे.
त्या सोबतच कामो असलेल्या तिकीट दरांनी "मुंज्या" ला अधिक पाठबळ दिले आहे. "मुंज्या'ची बॉक्स ऑफिस वरची ही चढाई हा प्रेक्षकांसाठी सुखद धक्का आहे.












Click it and Unblock the Notifications