Iran Israelयुद्धाचे बॉलिवूडमध्ये पडसाद: 'ट्रम्प-नेतान्याहूंनी मर्यादा ओलांडली', जावेद अख्तरांची टीका
Javed Akhtar Criticises Trump Netanyahu Over Iran Strikes : पश्चिम आशियात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे संपूर्ण जग हादरले आहे. या युद्धाचे पडसाद आता भारतीय मनोरंजन सृष्टीतही उमटू लागले आहेत. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी या लष्करी कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे भारतीय चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या इराणी वंशाच्या अभिनेत्रींनी इराणमधील सत्तापालटाच्या संकेतांवर आनंद व्यक्त केला आहे.

जावेद अख्तर यांचा संताप: "चीनची विश्वासार्हता पणाला"
नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या जावेद अख्तर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर आपली भूमिका मांडली. त्यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लक्ष्य केले.
अख्तर यांनी म्हटले की, मला वाटते की ट्रम्प आणि इस्रायल यावेळी खूप पुढे गेले आहेत. जर त्यांना इराकप्रमाणेच इराणशीही वागण्याची परवानगी दिली गेली, तर जगात चीनची संपूर्ण विश्वासार्हता नष्ट होईल. नेतान्याहू आणि ट्रम्प यांनी परिस्थिती इतकी ताणली आहे की, आता इतर नेत्यांकडे कठोर आणि स्पष्ट निर्णय घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही."
इराणी अभिनेत्रींकडून खमेनींच्या मृत्यूचे स्वागत
एककीकडे युद्धामुळे चिंता व्यक्त होत असताना, इराणमधील कट्टरतावादी राजवटीला विरोध करणाऱ्या अभिनेत्रींनी मात्र अयातुल्ला अली खमेनी यांच्या मृत्यूच्या बातमीवर समाधान व्यक्त केले आहे.
एलनाज नोरोझी: "४७ वर्षांची प्रतीक्षा संपली"
'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री एलनाज नोरोझी हिने इन्स्टाग्रामवर अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली. तिने लिहिले, "आपण ज्या बातमीची ४७ वर्षांपासून वाट पाहत होतो, ती अखेर आली आहे. खमेनी यांचे निधन झाले आहे. देव महान आहे." एलनाजने यापूर्वी इराणमधील 'नैतिकता पोलीस' आणि हिजाब सक्तीविरोधात कपडे उतरवून निषेध नोंदवला होता. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर तिने इराणमधील महिलांच्या हक्कासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला आहे.
मंदाना करिमी: "अँकरचे रडणे समाधानकारक"
'बिग बॉस' फेम इराणी मॉडेल मंदाना करिमी हिने इराणच्या सरकारी वाहिनीवरील (IRIB) अँकर्सची खिल्ली उडवली. खमेनी यांच्या मृत्यूची घोषणा करताना रडणाऱ्या अँकर्सना पाहून आपल्याला 'दिलासा' मिळत असल्याचे तिने म्हटले आहे.
एजाज खान यांची चिंता: "हा अल्लाहचा क्रोध"
अभिनेता एजाज खान याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सध्याच्या जागतिक परिस्थितीवर धार्मिक दृष्टिकोनातून भाष्य केले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात सुरू असलेल्या या बॉम्बस्फोटांबद्दल चिंता व्यक्त करताना तो म्हणाला:
"जगभरात मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. रमजानमध्ये हे बॉम्बस्फोट होणे हा अल्लाहचा क्रोध आहे. आपण एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे, गरिबांना मदत केली पाहिजे आणि जकात दिली पाहिजे, कारण पैसा कबरीत सोबत येत नाही."
युद्धाची पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती
२८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हजारो बॉम्ब डागले आहेत. इराणनेही पलटवार करत अमेरिकेच्या तळांना लक्ष्य केले आहे. या संघर्षात आतापर्यंत शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, जागतिक राजकारण दोन गटांत विभागले गेले आहे.












Click it and Unblock the Notifications