VIDEO: 'हाऊसफुल 5'साठी किती मानधन घेतलं? अक्षय कुमारचं मिश्किल उत्तर व्हायरल
बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अग्रक्रमावर असलेल्या अक्षय कुमारकडे चाहत्यांसह माध्यमांचंही नेहमी लक्ष असतं. त्याच्या प्रत्येक नव्या सिनेमाबाबत जितकी उत्सुकता असते, तितकीच चर्चा होते त्याच्या मानधनाबद्दल. 'हाऊसफुल 5'च्या ट्रेलर लाँच प्रसंगीही असाच एक प्रश्न पत्रकारानं विचारला - आणि खिलाडी कुमारनं त्याला दिलेलं उत्तर सध्या इंटरनेटवर गाजत आहे.

पत्रकाराचा थेट प्रश्न आणि अक्षयचा भन्नाट प्रतिसाद
'हाऊसफुल 5'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात एका पत्रकाराने अक्षयला विचारलं, "या सिनेमासाठी साजिद नाडियाडवालांकडून तुम्ही किती मानधन घेतलंत?" अक्षयनं नेहमीप्रमाणे आपल्या मिश्किल अंदाजात उत्तर दिलं, "मी पैसे घेतले. भरपूर घेतले. पण तुला मी का सांगू? तू काय माझा भाचा आहेस का? शिवाय सिनेमा उत्तम बजेटमध्ये तयार झाला आहे आणि मला खूप मजा आली."त्याच्या या उत्तरावर उपस्थित सगळेच हसून लोटपोट झाले.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया - "खिलाडी आहे तो!"
अक्षयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. युजर्स त्याच्या विनोदी शैलीचं भरभरून कौतुक करत आहेत. काही युजर्सनी लिहिलंय - "हाच आहे आपला रिअल खिलाडी!", "सेवेज रिप्लाय... अक्षय इज ऑन फायर", तर काहींनी म्हटलं - "मजा आणि
मस्तीमध्ये नंबर वन आहे अक्षय कुमार."
'हाऊसफुल 5'मध्ये कोणते कलाकार?
तर, 'हाऊसफुल 5' हा बहुप्रतीक्षित सिनेमा येत्या 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, चंकी पांडे, जॅकलीन फर्नांडिस, चित्रांगदा सिंह, नर्गिस फाखरी आणि फरदीन खान असे दमदार कलाकार झळकणार आहेत.
चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं असून, निर्मिती साजिद नाडियाडवाला यांच्या 'नाडियाडवाला ग्रँडसन' बॅनरखाली झाली आहे.












Click it and Unblock the Notifications