Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

10 वा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारीला, 65 खास फिल्म्स पाहण्याची संधी

Ajanta Verul International Film Festival :छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा झाली आहे. बुधवार, 15 ते रविवार, 19 जानेवारी 2025 दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगरच्या पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉलचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाची सहप्रस्तुती असणार आहे. या महोत्सवाचा डेलीहंट डिजीटल पार्टनर आहे. सॉलीटेअर टॉवर्स हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस् या महोत्सवाचे अ‍ॅकॅडमीक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम 90.8 हे रेडिओ पार्टनर आहेत.

Ajanta Verul International Film Festival

अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश

आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्‍या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने सांस्कृतिक केंद्र म्हणून आणि प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सवाच्या आयोजनामागे उद्देश आहे.

पाच दिवस भरगच्च कार्यक्रम

या महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात गतवर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक आणि एक लाख रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीच्या अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री सीमा बिस्वास (गुवाहाटी) या असतील तर ज्युरी सदस्य म्हणून ज्येष्ठ छायाचित्रकार सी. के. मुरलीधरन (मुंबई), ज्येष्ठ संकलक दिपा भाटीया (मुंबई), ज्येष्ठ दिग्दर्शक जो. बेबी (कोचीन) व ज्येष्ठ पटकथा लेखक व अभिनेते गिरीश जोशी (मुंबई) हे मान्यवर असणार आहेत.

'फिप्रेसी' ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 'फिप्रेसी भारत' हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील आताच्या पिढीतील ज्या दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील पहिले अथवा द्वितीय सिनेमे असणार आहेत, त्यांचे विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका व चित्रपट समीक्षक लतिका पाडगांवकर व शीलादित्य सेन (पश्चिम बंगाल), जी. पी. रामचंद्रन (केरळ) हे मान्यवर या समितीत सदस्य असणार आहेत.

कालिया मर्दन विशेष प्रदर्शन, उद्घाटन सोहळा आणि जीवन गौरव पुरस्कार

महोत्सवाच्या दशकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजन समितीच्या वतीने रसिकांना एका विशेष कार्यक्रमाची भेट दिली जाणार आहे. भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी 105 वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिद्ध मुकपट 'कालिया मर्दन' याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी संपन्न होणार आहे. शंभर वर्षांपूर्वीचे मुकपट सिनेगृहात प्रत्यक्ष संगीताद्वारे (लाईव्ह ऑर्केस्ट्रा) दाखविले जात. तोच अनुभव रसिकांना मिळावा म्हणून कालिया मर्दन हा मुकपट कोलकाता येथील 'सतब्दीर सब्द' या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला जाणार आहे. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मिणी सभागृहात बुधवारी 15 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता या मुकपटाचे प्रदर्शन करण्यात येईल. कालिया मर्दन विशेष प्रदर्शन व उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांसाठी प्रवेश खुला असेल.

यानंतर लगेचच याच ठिकाणी चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवारी 15 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता रूक्मिणी सभागृह, एमजीएम परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची उपस्थिती असणार आहे.

सई परांजपेंना पद्मपाणि पुरस्कार

यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या आणि चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामाकृष्णन, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, प्रोझोनचे सेंटर संचालक व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर. सोनी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री 9 वाजता पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली फ्रेंच आणि तामिळ भाषेतील फिल्म 'लिटील जाफना' फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस हा महोत्सव पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होईल.

समारोप सोहळा

फेस्टिव्हलचा समारोप सोहळा रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पीव्हीआर आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. सुप्रसिद्ध नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान, ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुक्कूट्टी व आयोजन समितीचे मानद अध्यक्ष प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होईल. सुवर्ण कैलास पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतील महत्वपूर्ण फिल्म 'द सीड ऑफ सॅक्रेड फिग' (पर्शियन) दाखविण्यात येणार आहे.

मास्टर क्लास व विशेष व्याख्यान

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध भरगच्च कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता पीव्हीआर-आयनॉक्स येथे पानसिंग तोमर, हासिल, साहब बीबी और गँगस्टर यांसारखे अनेक महत्वपूर्ण सिनेमांचे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग हे त्यांच्याशी संवाद साधतील.

गुरूवार, 16 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची 'स्वदेस'ची 20 वर्षे...' ही प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे त्यांच्याशी संवाद साधतील.

शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे 'ओटीटी माध्यमांवरील बदलता सिनेमा' या विषयावर परीसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध भारतीय भाषांमधील महत्वपूर्ण चित्रपट दिग्दर्शकांचा यात सहभाग राहील.

शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे 'मराठी भाषा अभिजात दर्जा व मराठी चित्रपट' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लेखिका लतिका पाडगांवकर, प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, लेखक क्षितिज पटवर्धन, चित्रपट महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सांवलकर, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे. महोत्सव संचालक सुनील सुकथनकर या चर्चेचे संवादक असतील.

शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे 'आधुनिक सिनेमातील तंत्र भाषा' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुक्कूट्टी, ज्येष्ठ छायाचित्रकार सी. के. मुरलीधरन, ज्येष्ठ संकलक दिपा भाटीया, ज्येष्ठ दिग्दर्शक जो. बेबी यांचा सहभाग राहणार आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे या चर्चेचे संवादक असतील.

शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे.

रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे 'इंडिया फोकस' या चित्रपट विभागातील दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे.

रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांच्या मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्याशी संवाद साधतील.

कलाकारांची उपस्थिती व संवाद

स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा

महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणार्‍या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या 5 शॉर्ट फिल्म महोत्सवादरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक व रोख 25 हजार रूपये देऊन गौरविण्यात येणार आहे.

चित्रपट रसग्रहण कार्यशाळा

चित्रपट महोत्सवामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात 25 महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन चित्रपट समिक्षकांच्या उपस्थितीत 6 ते 14 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात आले आहे.

प्रतिनिधी नोंदणी

चित्रपट महोत्सवास उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणी सुरू करण्यात आली आहे, जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांसाठी केवळ 550 रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ 350 रुपयांत या महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. प्रतिनिधी नोंदणी सुरुवात झाली असून aifilmfest.in या वेबसाईट वर चित्रपट रसिकांना ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी करता येईल तर प्रत्यक्ष नोंदणी पीव्हीआर-आयनॉक्स प्रोझोन मॉल, साकेत बुक वर्ल्ड (औरंगपुरा), विशाल ऑप्टीकल्स (उस्मानपुरा) व निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड येथे करता येईल.

संयोजन समिती

छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी aifilmfest.in या वेबसाईटवर तसेच [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, डॉ. अपर्णा कक्कड, आकाश कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, प्रेरणा दळवी, डॉ. आनंद निकाळजे, शिवशंकर फाळके, सुबोध जाधव, डॉ. कैलास अंभुरे, निखिल भालेराव, अमित पाटील, सुहास तेंडूलकर, डॉ. संदिप शिसोदे, किशोर निकम, अजय भवलकर आदींनी केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+