थेट बाराव्या मजल्यावर जावून सैफवर हल्ला झाला कसा? तो चोर होता की इतर कुणी? वाचा काय पडलेत प्रश्न
Questions after the attack on Saif बॅालीवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास चाकूहल्ला झाला. पहाटे पाच वाजेदरम्यान त्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफवर जे पाच वार झालेत, त्यापैकी दोन वार गंभीर असल्याचे डाँक्टरांनी सांगितले. आता या हल्ल्यानंतर काही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला असून, सदगुरु अपार्टमेंटमधील सर्वांची चौकशी सुरु आहे.

नेमके काय झाले?
सैफ अली खान व करिना कपूर हे वांद्रे येथील सदगुरु अपार्टमेंटध्ये बाराव्या मजल्यावर राहतात. काल रात्री उशीरा सैफ अली खानच्या घरी अज्ञाताने प्रवेश केला. त्याच्या मोलकरणीसोबत वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप केला तेव्हा, त्या व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला. त्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डाँक्टर काय म्हणतात?
लीलावती रुग्णालयाचे सीओओ डाँ. नीरज उत्तमनी यांनी उपचाराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सैफवर सहा जखमा आहेत. त्यापैकी दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम मणक्याजवळ आहे. त्याच जखमेसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर ती जखमी किती खोल आहे आणि आणखी काय आहे हे कळेल. सैफच्या मानेवरही हल्ला झाला आहे.
पोलिस काय म्हणतात?
परिमंडळ आठचे पोलिस उपायुक्त दीक्षीत गेडाम यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, अज्ञात व्यक्ती सैफच्या घरी मध्यरात्री घुसला. त्याने अगोदर मोलकरणीशी वाद घातला. तेव्हा सैफ त्याला समजवायला गेला. त्यानंतर त्या व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला. सैफ व घुसखोर यांच्यात त्यावेळी बाचाबाची झाली. या घटनेचा तपास सुरु आहे.
कोणते प्रश्न आहेत?
सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न समोर आले आहेत. त्याच प्रश्नांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांनी सैफच्या सर्व कामगारांचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत. या हल्ल्यानंतर पहिला प्रश्न पडला, तो व्यक्ती बाराव्या मजल्यावर पोहोचला कसा? कारण सैफच्या अपार्टमेंटला स्वयंचलीत लिफ्ट आहे. शिवाय लिफ्टमनही आहे. सैफचे स्वतःचे बाँडीगार्ड आहेत. अपार्टमेंटला सिक्युरीटी आहे. मग हे सगळं असताना तो व्यक्ती सैफच्या प्लॅटपर्यंत गेला कसा? हा प्रश्न आहे.
चोर होता की..?
दुसरा प्रश्न आहे की तो चोर होता का? कारण सैफ ज्या भागात राहतो, तो भाग मुंबईतील सर्वात सेफ समजला जातो. कारण तेथे सर्व बंगल्यांना स्वतःची सिक्युरीटी आहे. मग एवढी सगळी सिक्युरिटी भेदून हा व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने सदगुरु अपार्टमेंटला कसा पोहचू शकतो? मोलकरणीशी काय वाद झाला, हाही प्रश्नच आहे. कारण ही घटना पहाटे २.३० वाजेची सांगण्यात येते. या अज्ञात व्यक्तीने सुरवातीला सैफच्या मोलकरणीशी वाद घातल्याचे काहींचे म्हणणे आहे. मग हा वाद घातला असेल तर सैफचे सिक्युरीटी लगेच तेथे आले असते. शिवाय तो चोर असेल तर वाद का घालेल? मोलकरणीने पाहिल्यावर तो पळून जायला हवा होता? मात्र हे सगळे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. त्यावरच पोलिसांचे काम सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications