सिनेसृष्टीवर शोककळा! अभिनेत्री प्रिया मराठेंची झुंज संपली; वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Priya Marathe Passes Away at 38 Due to Cancer : 'पवित्र रिश्ता' आणि 'तुझेच मी गीत गात आहे' या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (रविवार) पहाटे चार वाजता त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने मराठी आणि हिंदी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या वर्षभरापासून त्या कोणत्याही कामात सक्रिय नव्हत्या आणि सोशल मीडियावरही त्यांचे दर्शन नव्हते, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रकृतीच्या कारणामुळे सोडली होती मालिका
प्रिया मराठे यांनी अखेरची भूमिका 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत साकारली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी ही मालिका अचानक सोडली होती. त्यावेळी त्यांनी एका व्हिडिओद्वारे आपल्या चाहत्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.
'शूटिंगचं वेळापत्रक आणि माझ्या आरोग्याचा समतोल साधणं कठीण होतं, त्यामुळे मी मोनिकाची भूमिका सोडत आहे', असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते, परंतु आता त्यांच्या निधनानंतर यामागचं कारण स्पष्ट झालं आहे.
कलाविश्वातील प्रवास
प्रिया मराठे यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात 'या सुखांनो या' या मराठी मालिकेतून केली होती. त्यानंतर त्यांनी 'चार दिवस सासूचे' यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
'कसम से' या मालिकेतून त्यांनी हिंदी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. एकता कपूरच्या गाजलेल्या 'पवित्र रिश्ता'मध्ये त्यांनी वर्षाची भूमिका साकारली, जी खूप गाजली. याशिवाय, 'बडे अच्छे लगते है' मध्येही त्यांनी ज्योती मल्होत्रा ही भूमिका साकारली होती.
प्रिया यांनी २४ एप्रिल २०१२ रोजी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी मालिकाविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.












Click it and Unblock the Notifications