CBSE बोर्ड परीक्षा 2025 : दहावी-बारावीचे पेपर लीक झालेत का? CBSE बोर्डाने दिला 'हा' इशारा
सध्या CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. गेल्या १४ फेब्रुवारीपासून त्या सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर काही ठिकाणी सीबीएसई बोर्डाचे हेच पेपर लीक झाल्याचे दावे केले जात आहेत. या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली होती. जे हुशार विद्यार्थी आहेत, त्यांचे टेन्शन वाढले होते. मात्र आता, स्वतः सीबीएसई बोर्डाने याबाबत एक सूचना प्रसिद्ध केली आहे.

काय म्हणतंय सीबीएसई बोर्ड?
सीबीएसई बोर्डाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ज्यामध्ये पेपर लीक झाल्याचा दावा करणाऱ्या घटकांना इशारा देण्यात आला आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षा- २०२५ च्या प्रश्नपत्रिका फुलटल्याचा किंवा त्या मिळण्याचा दावा सपशेल खोटा असल्याचे, सीबीएसईने म्हटले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की काही समाजकंटक पेपर लीक झाल्याबद्दल अफवा पसरवत आहेत. YouTube, Facebook आणि X (पूर्वीचे ट्विटर) यासारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पेपरमध्ये मिळाल्याचा दावा करत आहेत. हे सर्व दावे निराधार आहेत. विद्यार्थी आणि पालकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
कारवाई करण्याचा इशारा
या सगळ्या प्रकाराबाबत आता सीबीएसई बोर्ड कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सीबीएसई लक्ष ठेवून आहे. या गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी बोर्ड कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत सीबीएसई बोर्डाचे काम सुरु आहे. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, हे प्रकार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा व त्यांच्यावर उचित कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सीबीएसईचे पालकांना आवाहन
बोर्डाने पालकांना विनंती केली आहे की, त्यांनी त्यांच्या मुलांना या अफवांपासून दूर ठेवावे. विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम करणाऱ्या अफवांपासून आपल्या पाल्यांना दूर ठेवण्याची विनंती सीबीएसई बोर्डाने पालकांना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "विद्यार्थी, पालक आणि शाळांसह सर्व भागधारकांनी अचूक अपडेटसाठी फक्त सीबीएसईच्या अधिकृत सूचनांवर अवलंबून राहावे, जे वेबसाइट (www.cbse.gov.in) आणि सत्यापित सार्वजनिक चॅनेलवर उपलब्ध आहेत. इतर माहितीवर विश्वास ठेऊ नये."












Click it and Unblock the Notifications