NEET Paper : एकीकडे देशभरात सुरू आहे नीटचा पेपर दुसरीकडे 40 लाखांमध्ये झाली पेपरची डील, तिघांना अटक!
NEET UG Exam 2025 : आज देशभरातील विविध सेंटर्सवर नीट परीक्षा-2025 पार पडत आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये नीटचा पेपर पोलिस बंदोबस्त व सीसीटीव्हीच्या निगराणी खाली सुरू आहे. अशातच, राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नीट युजी परीक्षेच्या परीक्षेत पास करून देण्यासाठी व पेपर लीक करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या तिघांना राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीट यूजी परीक्षेत फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) ने NEET परीक्षेच्या इच्छुक विद्यार्थ्याला 40 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.
या लोकांनी विद्यार्थांना परीक्षेचा पेपर देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा कट रचला होता. ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा आज 4 मे 2025 रोजी देशभरात नीट-यूजी परीक्षा होत आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलवान (27), मुकेश मीना (40) आणि हरदास (38) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी NEET-UG परीक्षेचा पेपर असल्याचा दावा करून एका NEET उमेदवाराची आणि त्याच्या कुटुंबाची फसवणूक केली.
कसा घडला होता नेमका प्रकार?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, सदर आरोपींनी विद्यार्थ्याला आणि त्याच्या कुटुंबाला गुरुग्रामला घेऊन गेले आणि 40 लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबाने कागदपत्रे दाखवण्यास सांगितले, परंतु त्यांनी नकार दिल्यावर कुटुंबातील लोकांना शंका आली आणि त्यांनी एसओजीला कळवले.
यानंतर, शनिवारी एसओजीने तिघांनाही अटक केली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना अशा खोट्या आश्वासनांपासून सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. नीट सारख्या परीक्षांमध्ये कॉपीचे प्रमाण वाढत आहे. फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
NTAने जारी केले विशिष्ट वेबपोर्टल
यापूर्वी, राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) नीट (UG) 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बनावट माहितीपासून वाचवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले होते.
एनटीएने 26 एप्रिल 2025 रोजी एक विशेष पोर्टल सुरू केले होते, ज्यामध्ये लोकांना संशयास्पद हालचालींबद्दल माहिती देण्याचे आवाहन केले जात होते. आतापर्यंत या पोर्टलद्वारे 1500 हून अधिक संशयास्पद माहिती मिळाली आहे, त्यापैकी बहुतेक माहिती टेलिग्रामशी संबंधित आहे.
106 टेलिग्राम आणि 16 इंस्टाग्राम चॅनेल ओळखले गेले एनटीएने 106 टेलिग्राम आणि 16 इंस्टाग्राम चॅनेल ओळखले आहेत जे नीट (यूजी) 2025 पेपर लीकचा खोटा दावा करत होते.
या चॅनेल्सवर चुकीची माहिती देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात होता. हे चॅनेल काढून टाकण्यासाठी एनटीएने टेलिग्राम आणि इंस्टाग्रामशी संपर्क साधला आहे. याशिवाय, अशा बनावट चॅनेल्सवर कारवाई करण्यासाठी, NTA ने ही प्रकरणे गृह मंत्रालयाच्या सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) कडे सोपवली आहेत.
लातूरमध्ये 51 परीक्षा केंद्रावर 'नीट' परीक्षा सुरळीत
लातूर जिल्ह्यातील 51 परीक्षा उपकेंद्रांवर राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत नीट-2025 ही परीक्षा दुपारी 02 ते 05 या वेळेत नीट परीक्षा सुरळीतपणे सुरु होती. नीट परीक्षे दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. त्यांचे पालन सर्वच परीक्षा केंद्रावर होत असल्याचे दिसून आले.
लातूरच्या पुरणमल लाहोटी केंद्रावर मुख्य प्रवेश द्वारावरील अधिकारी-कर्मचारी हे काही पालक, विद्यार्थ्यांशी शिस्तीच्या नावाखाली हुज्जत घालत असल्याचे दिसून आले. या व्यतिरिक्त कुठल्याही अनुचित प्रकारचे वृत्त नाही.
लातूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्नही वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला होता. सकाळी 07 ते सायंकाळी 07 पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनीक्षेप इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध शहराेमध्ये देखील आज नीटची परीक्षा सुरळीत पार पडत आहे, असेही समोर आले आहे.












Click it and Unblock the Notifications