MPSC Exam 2025: अखेर MPSCने जाहीरात काढली, एकूण जागा किती, अर्जाची मुदत कधीपर्यंत, वाचा सविस्तर
MPSC Announced 385 posts : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2025 च्या तात्पुरत्या वेळापत्रकात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी 2025 मध्ये येण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, मार्च महिना उलटूनही अद्याप जाहिरात न आल्याने राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. अशातच अखेर मंगळवारी एमपीएससीच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
विविध संवर्गातील एकूण 385 जागांसाठी ही जाहिरात असून नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025 ही 28 सप्टेंबरला होणार आहे. राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
आयोगाने यंदा 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी मुंबई, पुणे, नागपूर अशा विविध शहरांमध्ये राज्यसेवा परीक्षेची नव्या पद्धतीनुसार तयारी करत आहे.

अशी राहणार अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्याचा कालावधी- 28 मार्च ते 17 एप्रिल.
- ऑनलाईन शुल्क भरण्याचा दिनांक-17 एप्रिल.
- चालनद्वारे शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक-21 एप्रिल.
अशा आहेत विभागनिहाय जागा
- सामान्य प्रशासन विभाग- राज्यसेवा- 127
- महसूल व वन विभाग- महाराष्ट्र वनसेवा-144
- सार्वजनिक बांधकाम विभाग- स्थापत्य अभियांत्रिकी सेवा- 114
नॉन-क्रिमीलेयर मर्यादा संपण्याची होती भिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार 2025 सालची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. याची जाहिरात जानेवारी 2025 मध्ये येण्याची शक्यता होती.
तर या परीक्षेचा निकाल 2026 च्या जानेवारी महिन्यात लागणार आहे. राज्यसेवेच्या विविध संवर्गातील 35 पदांची भरती होणार आहे. परंतु, अद्याप जाहिरात न आल्याने राज्यातील शेकडो उमेदवारांना राजपत्रित अधिकारी होण्याच्या स्वप्नांवर पाणी पडणार होते.
राज्यातील मराठा, मराठा कुणबी, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीमध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र जमा करणे बंधनकारक असते. परंतु, विद्यार्थ्यांच्या नॉन -क्रिमीलेयर प्रमाणपत्राची मर्यादा ३१ मार्चला संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी जाहिरात यावी अशी मागणी होत होती.












Click it and Unblock the Notifications