CBSE शैक्षणिक वर्ष 2025-26चे पालकत्व कॅलेंडर 'या' दिवशी जाहीर करणार, कुठे अन् कसे पाहायचे घ्या जाणून
CBSE Parenting Calendar for 2025-26 : सीबीएसईने 2025-26 सत्रासाठी पालकत्व दिनदर्शिका लाँच करण्याची घोषणा केली आहे. पालक-शिक्षक सहकार्य वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याचा यामागील प्रमुख उद्देश आहे.
उद्या अर्थात 28 मार्च रोजी सीबीएसईच्या यूट्यूब चॅनलवर ते अधिकृतरित्या जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाला चालना देणे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या अनुषंगाने समग्र शिक्षण सक्षम करणे हा यामागील प्रमुख उद्देश असणार आहे.
पालकत्व दिनदर्शिकेचे अधिकृत लाँचिंग
सीबीएसईने जाहीर केलेल्या माहितीनुसार, हे पालकत्व कॅलेंडर 28 मार्च रोजी दुपारी 4 वाजता औपचारिकपणे लाँच केले जाईल. हा लाँचिंग कार्यक्रम सीबीएसईच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रसारित केला जाईल, जिथे शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील इतर तज्ञांना सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

पालकत्व दिनदर्शिकेचा उद्देश
पालकत्व दिनदर्शिका सीबीएसईने अनेक उद्दिष्टे लक्षात घेऊन तयार केली आहे. ज्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. पालक आणि शिक्षकांमध्ये चांगले समन्वय स्थापित करणे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी संवादाला प्रोत्साहन देणे.
शाळांमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक पद्धतशीर प्रणाली विकसित करणे. या कॅलेंडरच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्यात मजबूत संबंध निर्माण होतील, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक वाढीला चालना मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.
सीबीएसई पालकत्व दिनदर्शिका समितीची स्थापना
या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी, सीबीएसईने जानेवारी 2025 मध्ये शिक्षणतज्ज्ञ आणि शाळेच्या मुख्याध्यापकांची एक समिती स्थापन केली होती. समितीला खालील बाबी विचारात घेऊन एक प्रभावी चौकट विकसित करण्याचे काम सोपवण्यात आले होते. यामध्ये सांगण्यात आले होते की, पालक-शिक्षक संवाद अधिक प्रभावी बनवणे. किशोरवयीन आणि विशेष गरजा असलेल्या मुलांच्या गरजा समजून घेणे आणि त्या पूर्ण करणे. शाळांमध्ये संरचित सहभाग आणि संवाद प्रणाली विकसित करणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पालक समितीची स्थापना केली गेली होती.
सीबीएसई पालकत्व समितीत कोणाचा समावेश
सीबीएसई पालकत्व दिनदर्शिका समितीची स्थापना झाल्यानंतर या समितीचे अध्यक्षपद सरदार पटेल विद्यालयाच्या प्राचार्या अनुराधा जोशी यांच्याकडे आहे. त्यात देशभरातील नामांकित शाळांमधील अनुभवी शिक्षकांचा समावेश आहे. समिती सदस्यांनी हे कॅलेंडर तयार करण्यासाठी व्हर्च्युअल आणि ऑफलाइन माध्यमातून सहकार्य केले. 15 मार्च 2025 पर्यंत अंतिम शिफारसी सादर केल्या. या उपक्रमांतर्गत, सीबीएसईने या पालकत्व दिनदर्शिकेच्या लाँच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शाळा प्रमुख, शिक्षक, समुपदेशक, कल्याण प्रशिक्षक आणि पालकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.












Click it and Unblock the Notifications