UPI युजर्ससाठी मोठी बातमी! Paytm, PhonePe, GPay द्वारे आता दररोज 10 लाखांपर्यंत व्यवहार करता येणार
UPI daily payment limit increased : युपीआय वापरणाऱ्यांसाठी एक मोठी सुविधा मिळणार आहे. Paytm, PhonePe, GPay द्वारे आता दररोज 10 लाखांपर्यंत व्यवहार करता येणार आहे. जर तुम्ही Paytm, PhonePe किंवा Google Pay सारखे डिजिटल पेमेंट ॲप्स वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही एक मोठी खुशखबर आहे.
युपीआय व्यवहारासंदर्भात सर्व निर्णय घेणारी, भारत सरकारची अधिकृत संस्था नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांची (Transaction) मर्यादा वाढवली आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांना फायदा होणार आहे.

कुणाला होईल फायदा?
युपीआय वापरकर्ते, विशेषतः ज्यांना दररोज मोठे व्यवहार करायचे असतात, उदा. विमा प्रीमियम भरणे, कर्जाचे हप्ते (EMI) भरणे, शेअर बाजारात गुंतवणूक करणे किंवा मोठ्या ट्रॅव्हल बुकिंग करणे, अशा लोकांसाठी ही एक मोठी सुविधा ठरणार आहे.
१५ सप्टेंबरपासून नवे नियम लागू , ही अट
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- NPCI ने वाढवलेली ही नवीन मर्यादा १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल. यानंतर, 'व्हेरिफाईड मर्चंट्स' (Verified Merchants) दररोज १० लाख रुपयांपर्यंतचे ऑनलाइन पेमेंट करू शकतील. मात्र, दोन व्यक्तींमधील (Person-to-Person - P2P) व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच दररोज १ लाख रुपये राहील. NPCI ने स्पष्ट केले आहे की, या नवीन UPI मर्यादा वाढीवर कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. हे बदल केवळ 'पर्सन-टू-मर्चंट' (P2M) पेमेंट्सवर लागू होतील.
कोणत्या व्यवहारांची मर्यादा वाढली?
१५ सप्टेंबरपासून खालील प्रकारच्या पेमेंट मर्यादा बदलणार आहेत.
क्रेडिट कार्ड बिल भरणा - यूपीआयद्वारे क्रेडिट कार्ड बिल भरण्याची एकवेळची मर्यादा आता ५ लाख रुपये करण्यात आली आहे. एका दिवसात जास्तीत जास्त ६ लाख रुपयांपर्यंत भरणा करता येईल.
दळणवळण क्षेत्र - प्रवास क्षेत्रातील यूपीआय व्यवहारांची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे.
सरकारी ई-मार्केटप्लेसवर कर आणि ईएमडी पेमेंट्स - आता ५ लाख रुपयांपर्यंत करता येतील.
विमा प्रीमियम आणि कॅपिटल मार्केट गुंतवणूक - पूर्वी २ लाख रुपये असलेली मर्यादा वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. एका दिवसात जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतील.
कर्ज आणि ईएमआय भरणा - कर्जाचे हप्ते भरण्याची मर्यादा प्रति व्यवहार ५ लाख रुपये करण्यात आली आहे. यूपीआयद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत भरणा करता येईल.
दागिने खरेदी - दागिने खरेदीसाठी व्यवहाराची मर्यादा १ लाख रुपयांवरून २ लाख रुपये करण्यात आली आहे, तर दैनंदिन मर्यादा ६ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
बँकिंग सेवा (टर्म डिपॉझिट) - टर्म डिपॉझिटसाठी डिजिटल ऑनबोर्डिंगवर आता ५ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांना परवानगी असेल.
परदेशी चलन (Forex) पेमेंट देणे- बीबीपीएस (BBPS) द्वारे आता ५ लाख रुपयांपर्यंत फॉरेक्स पेमेंट शक्य होईल.
'हे' लक्षात ठेवा
आयपीओ (IPO) मध्ये यूपीआयद्वारे पैसे लावण्याची मर्यादा ५ लाख रुपये प्रति व्यवहार कायम राहील. आयपीओसाठी १० लाख रुपयांची नवीन मर्यादा लागू होणार नाही.
या नवीन बदलांमुळे डिजिटल पेमेंट करणे अधिक सोपे, वेगवान आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications