Free LPG Cylinder : दिवाळीपूर्वी मोठी भेट! 'या' ठिकाणच्या महिलांना मिळणार मोफत एलपीजी सिलेंडर!
UP Govt Announces Free LPG Cylinder Refill : दिवाळीच्या पार्श्वभुमीवर गरीब कुटुंबांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) अंतर्गत असलेल्या महिलांसाठी मोफत एलपीजी सिलेंडर रिफिल योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील जवळपास १.८५ कोटी महिला लाभार्थ्यांना थेट फायदा होणार असून, सणासुदीच्या काळात कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या योजनेसाठी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने १३८५.३४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पालाही मंजुरी दिली आहे.

योजनेची अंमलबजावणी दोन टप्प्यांत
उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार मोफत एलपीजी सिलेंडर रिफिल दोन टप्प्यांत वाटप करणार आहे. पहिला टप्पा ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ (दिवाळीच्या पार्श्वभूमीवर) असेल तर दुसरा टप्पा: जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीसाठी असेल. या धर्तीवर आता महाराष्ट्रातही महायुती सरकारने मोफत गॅस सिलिंडर देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पात्रता आणि लाभ कसा मिळेल?
या योजनेचा लाभ केवळ उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नोंदणीकृत (Registered) महिला लाभार्थींना मिळणार आहे. ही योजना मुख्यत्वे कमी उत्पन्न असलेल्या आणि PMUY कनेक्शन असलेल्या कुटुंबांना लक्ष्य करते.
लाभ वितरण: पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या एलपीजी वितरकामार्फत (Distributor) सिलेंडर रिफिल थेट प्राप्त होईल किंवा त्याबद्दल कळवले जाईल.
आधार लिंक आवश्यक: लाभार्थ्यांनी त्यांचे एलपीजी कनेक्शन सक्रिय आहे आणि आधार कार्डशी लिंक केलेले आहे, याची खात्री करावी.
उज्ज्वला योजना काय आहे?
भारत सरकारने सुरू केलेल्या PMUY चा उद्देश दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील महिलांना स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन (LPG) उपलब्ध करणे हा आहे. यामुळे लाकूड आणि कोळसा यांसारख्या पारंपारिक स्वयंपाकाच्या पद्धतींमुळे होणारे आरोग्याचे धोके कमी होतात आणि महिलांना सुरक्षित व स्वच्छ ऊर्जा वापरून सक्षम बनवता येते. महाराष्ट्रात उज्ज्वला योजनेचे असंख्य लाभार्थी आहेत. ते दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर त्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ कितपत मिळतो याची त्यांना प्रतिक्षा आहे.
योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये
स्वच्छ इंधन पुरवणे: ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजी गॅस पुरवून स्वयंपाक करण्यासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे.
आरोग्य सुधारणे: पारंपरिक इंधनाच्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम कमी करणे.
महिला सक्षमीकरण: महिलांना घरातून मिळणारा धुराचा त्रास कमी करून त्यांना अधिक सुकर जीवनशैली देणे.












Click it and Unblock the Notifications