सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता! 91 हजारांवर येऊ शकतात भाव; तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, जाणून घ्या
सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे. जळगावच्या सराफा बाजारात गेल्या काही दिवसांतील किंमतींमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सलग काही आठवड्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दरांनी आता उसंत घेतली असून, सोन्याची किंमत पुन्हा एकदा 1 लाखाच्या खाली आली आहे. सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही व्यावसायिकांचा अंदाज आहे की, किंमत 91,000 पर्यंत खाली येऊ शकते.

पाच दिवसांत 3,300 रुपयांची घसरण
जळगावच्या बाजारात केवळ पाच दिवसांत सोन्याचा दर तब्बल 3,300 ने घसरला आहे. काही दिवसांपूर्वी जीएसटीसह सोन्याचा दर प्रति तोळा 1,02,000 च्या आसपास गेला होता. मात्र आता तो घसरून 98,700 इतका झाला आहे.
चांदीही झाली स्वस्त
सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण नोंदवली गेली आहे. विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या चांदीच्या दरात पाच दिवसांत 2,500 इतकी घट झाली असून, जीएसटीसह चांदीचा सध्याचा दर प्रति किलो 1,09,000 इतका आहे.
ग्राहकांची खरेदी वाढली
दरात मोठी घसरण झाल्याने सराफा बाजारात पुन्हा खरेदीला गती मिळताना दिसत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा दर 1 लाखच्या पुढे गेले होते, तेव्हा ग्राहक थांबले होते. मात्र आता किंमती पुन्हा घसरल्याने सोने खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणावर बाजारात येऊ लागले आहेत.
जागतिक परिस्थितीचा परिणाम
जळगावच्या सराफा व्यावसायिकांच्या मते, इराण-इस्त्रायलमधील संघर्षाचा थेट परिणाम या किंमतींवर झाला आहे. जून महिन्यात या युद्धजन्य परिस्थितीमुळे दरांमध्ये मोठे चढ-उतार झाले. जर पुढील काळात या देशांमध्ये शांतता नांदली, तर सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही व्यावसायिकांचा अंदाज आहे की, किंमत 91,000 पर्यंत खाली येऊ शकते.
गोंधळलेल्या ग्राहकांची अवस्था
दर आठवड्याला भाव चढ-उतार होत असल्याने अनेक ग्राहक अजूनही संभ्रमात आहेत. खरेदी करायची की थांबायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तरीही, सध्याच्या सवलतीच्या दराचा फायदा घेत अनेकांनी खरेदी सुरू केली आहे.












Click it and Unblock the Notifications