फायद्याची बातमी! 4 नव्हे आता 2 स्लॅब, GST मध्ये बदल झाल्यानंतर कोणत्या वस्तू स्वस्त होणार? वाचा यादी
GST Reform Which items will become cheaper : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी 15 ऑगस्ट रोजी एक गोड बातमी दिली आणि जीएसटीमध्ये मोठे बदल होऊन देशवासीयांना दिलासा दिला आहे.दिवाळीपुर्वी जीएसटीमध्ये मोठे बदल होतील हे नक्की झाले आहेत,खास बाब म्हणजे नागरिकांना याचा फायदाही होणार असेही सुतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळे आता जीएसटीमध्ये नेमके का बदल होणार आणि कोणत्या वस्तू स्वस्त होतील याचे वेध नागरिकांना लागले आहेत.

भारत सरकार दिवाळीपूर्वी वस्तू आणि सेवा करा (GST) मध्ये मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. या बदलांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल आणि अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा परिणाम संतुलित करता येईल, अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे सामान्य नागरिकांना महागाईची झळही कमी बसेल असा अंदाज आहे. आपण या वृत्तामध्ये जीएसटीत नेमके काय बदल होतील आणि कोणत्या वस्तू स्वस्त होतील हे पाहूया.
जीएसटीत चारऐवजी दोन टॅक्स स्लॅब
सध्या GST मध्ये 5%, 12%, 18% आणि 28% असे चार प्रमुख स्लॅब आहेत. मात्र, प्रस्तावित बदलांनुसार आता फक्त दोनच स्लॅब राहतील. याचा अर्थ 12% आणि 28% चे स्लॅब रद्द होऊन ते 5% आणि 18% मध्ये समाविष्ट केले जातील. यामुळे दैनंदिन वापरातील वस्तू, गाड्या आणि अनेक सेवांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
दैनंदिन वस्तू होणार स्वस्त
गुड रिटर्न्सने पीटीआयच्या अहवालानुसार वृत्त दिले. 28% स्लॅबमध्ये येणाऱ्या सुमारे 90% वस्तू 18% स्लॅबमध्ये समाविष्ट केल्या जातील. त्याचप्रमाणे, 12% स्लॅबमधील बहुतेक उत्पादने 5% स्लॅबमध्ये येतील. याचा थेट परिणाम काही उत्पादनांवर होण्याची शक्यता आहे.
GSTमध्ये बदलानंतर 'या' वस्तू होतील स्वस्त!
जीएसटीमध्ये दिवाळीपुर्वी बदल केल्यानंतर औषधी, पॅकेज्ड खाद्यपदार्थ, दुग्धजन्य उत्पादने, कपडे, हॉटेल सेवा आणि काही बांधकाम साहित्य स्वस्त होऊ शकते असा या बदलाचा अर्थ आहे. आता या वस्तू आणि सेवा स्वस्त होण्याची लोकही वाट पाहत आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो सेक्टरला फायदा
इलेक्ट्रॉनिक्स: 18% आणि 28% चे स्लॅब एकत्र केल्याने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल. AC, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि सिमेंटसारख्या वस्तूंवरील कर कमी होईल.
ऑटो सेक्टर: लहान गाड्या आणि दुचाकी खरेदी करणे सोपे होईल. 1200cc पर्यंतच्या गाड्या आणि 500cc पर्यंतच्या बाईक्स आता 28% ऐवजी 18% स्लॅबमध्ये येऊ शकतात. यामुळे मारुती सुझुकी आणि हिरो मोटोकॉर्पसारख्या कंपन्यांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.
लक्झरी वस्तूंवर जास्त कर कायम
सरकारने 'सिन गुड्स' (Sin Goods) म्हणजेच महागड्या गाड्या, लक्झरी वस्तू आणि तंबाखू उत्पादनांसाठी एक नवा 40% टॅक्स स्लॅब ठेवला आहे. याचा अर्थ, या वस्तूंवरील कर पूर्वीप्रमाणेच जास्त राहील.कारण या वस्तू जीवनावश्यक अथवा दैनंदिन नाहीत.
सोने आणि पेट्रोल-डिझेलवर परिणाम नाही
भारतासाठी महत्त्वाच्या निर्यात वस्तू असलेल्या हिरे आणि रत्नांवर सध्या कोणताही बदल होणार नाही. तसेच, पेट्रोल आणि डिझेल अजूनही GST च्या कक्षेत आणले जाणार नाहीत. कारण पेट्रोलच्या स्वतंत्र किमती जाहीर करण्याचे धोरण आहे.
दिवाळी होणार गोड, मिळणार दिलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील घोषणेनुसार, जर हे बदल वेळेत लागू झाले, तर दिवाळीपूर्वी सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. खास बाब म्हणजे दिवाळीच गोड होईल अशी शक्यता आहे. खाद्यपदार्थांपासून ते बांधकाम साहित्य आणि वाहनांपर्यंत अनेक वस्तूंच्या किमती कमी होतील. व्यावसायिकांनाही कराच्या गुंतागुंतीतून सुटका मिळेल आणि व्यवसाय करणे अधिक सोपे होईल.












Click it and Unblock the Notifications