Gold Loan :सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांना मिळेल आता जास्त रक्कम! पण कशी? उदाहरणासह समजून घ्या 5 मुद्द्यात
Gold Loan : सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांसाठी आरबीआय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. लवकरच तुम्हाला तुमच्या सोन्याच्या मूल्याच्या ८५ टक्के कर्ज मिळू शकेल. सध्या फक्त ७५ टक्के रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध आहे. ही सोने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी माहिती दिली की, मध्यवर्ती बँक सोन्यावरील कर्जांसाठी कर्ज-मूल्य (एलटीव्ही) प्रमाण सध्याच्या ७५ टक्क्यांवरून ८५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे. ही सवलत काही अटींसह दिली जाईल. या निर्णयामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सामान्यांकडे गुंतवणुकीचे महत्वाचे साधन म्हणजे सोने आहे. ऐनवेळी आर्थिक गरज पडल्यास गुंतवलेले सोने गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्यात सामान्यांची मोठी संख्या आहे. पण कधी कधी त्यांना सोन्यावरील कर्जाची रक्कम अपेक्षित असते तेवढी मिळत नाही, अशावेळी कर्ज मिळूनही उपयोग होतोच असे नाही. अशावेळी आता सोन्याच्या मुल्यावर ७५ ऐवजी ८५ म्हणजे दहा टक्के रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून जास्त मिळणार आहे.
हे कसे शक्य आहे उदाहरणासह पाहू...
समजा सध्याच्या कर्ज नियमानुसार,तु्म्हाला कर्ज हवे असेल आणि तुम्हाला सोन्यावरच कर्ज घ्यायचा पर्याय असेल. अशावेळी जर तुम्हच्याकडे एक लाख रुपयांचे मूल्य असलेले सोने असेल तर बँक तुम्हाला जास्तीत जास्त ७५ हजार रुपये कर्ज स्वरुपात देईल. त्यापेक्षा एक रुपयाही जास्त कर्ज म्हणून नियमानुसार,वर देता येत नाही. आता आगामी निर्णयानुसार, तुमच्या एक लाखाच्या सोन्याच्या मुल्यावर तुम्हाला ८५ हजार रुपये कर्ज स्वरुपात मिळू शकणार आहेत.म्हणजे एक लाखाला दहा हजार अतिरिक्त तुम्हाला मिळू शकतील.
या पाच मुद्द्यात समजून घ्या गोल्ड लोनबद्दल
१.सोन्यावरील कर्जांसाठी कर्ज-मूल्य (एलटीव्ही) प्रमाण सध्याच्या ७५ टक्क्यांवरून ८५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी आरबीआय करत आहे. सोन्यावरील कर्जांसाठी कर्ज-मूल्याची गणना करताना, मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट केले जातील, तर सध्या फक्त मुद्दलवर भर दिला जातो.
२. आतापर्यंत कर्ज-मूल्य गुणोत्तर ७५ टक्के होते. आरबीआय २.५ लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या लहान कर्जांसाठी ते ८५ टक्क्यांपर्यंत वाढवत आहोत.
३. सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था सध्याच्या ७५ टक्के एलटीव्ही मर्यादेत सोने कर्ज देताना व्याज आणि मुद्दल दोन्ही समाविष्ट करत आहेत, परंतु काही बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि लहान बँकांमध्ये एलटीव्ही ८८ टक्क्यांपर्यंत वाढवला जात आहे.
४. सोने तारण ठेवून घेतल्यास २.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 'क्रेडिट' मूल्यांकनाची आवश्यकता नाहीशी होईल. जर एखादी वित्तीय संस्था प्राधान्य क्षेत्रातील कर्ज म्हणून वर्गीकृत करून कर्जाचा फायदा घेत असेल तरच कर्जाचे अंतिम वापर निरीक्षण करणे अनिवार्य असेल.
५. जर एखाद्या वित्तीय संस्थेकडे सोन्याव्यतिरिक्त इतर सिक्युरिटीज असतील, तर कर्ज-मूल्याचे प्रमाण क्रेडिट मूल्यांकनानुसार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असू शकते.












Click it and Unblock the Notifications