सोन्याचे दिवस फिरले! दर घसरल्यानंतर मागणीतही घट, वाचा कारण काय?
मुंबई : सोन्याचा मोह कुणाला नसतो, सोन्याची उपमाही अनेकांना दिली जाते. दागदागिने तर महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. यंदाच्या जानेवारीनंतर सोन्याला सुगीचे दिवस आले होते. सामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याचे भाव पोहचले होते. पण सोन्याचे दिवस फिरल्याचे दिसून येत आहे.
सोन्याच्या दरात सद्यस्थितीत घसरण सुरुच असून मागणीतही मोठी घट दिसून येत आहे, पण भाव कमी होण्याचे कारण काय? हे जाणून घेऊया.

वल्ड गोल्ड काऊन्सिलचे म्हणणे काय?
- सतत वाढणाऱ्या किंमतींचा विपरित परिणाम सोन्याच्या मागणीवर दिसून आला आहे.
- चालू आर्थिक वर्षाच्या मार्च ते जून या तिमाहीत देशभरात सोन्याच्या मागणीत 5 टक्के घट झाली आहे.
- या तिमाहीत 149.70 टन सोन्याला मागणी आल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
- यापूर्वी एप्रिल ते जून 2023 या मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात सोन्याची मागणी 158.10 टन नोंदवली गेली होती.
अबब..एवढी सोने खरेदी?
- मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नागरिकांनी 82,530 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले होते.
- चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर नागरिकांनी 93,850 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी केली.
..असा होता अंदाज
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या मागणीत वाढ होईल, असा कयास होता. सोन्याच्या आयातीवरील शुल्कात 9 टक्के घट केल्यामुळे आगामी काळात सोन्याच्या मागणीत वाढ होईल. त्याचवेळी दुसऱ्या तिमाहीपासून सणासुदीचे दिवस सुरू होत असल्यामुळेही सोन्याची मागणी वाढेल, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे म्हणणे होते.
..म्हणून खरेदी कमी झाली
- सोन्याचा भाव सातत्याने वाढत गेल्यामुळे सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. यामुळे सोने खरेदी धीम्या गतीने झाली आहे.
- सध्या कोणतेही मोठे सण नाहीत त्यामुळे सोन्याची खरेदी मंदावली.
- देशात पावसाळ्यात उद्योगधंद्यांवरही परिणाम जाणवतो पर्यायाने सोने खरेदीतही उठाव नाही
- देशातील दागिन्यांच्या मागणीत 17 टक्के घट होऊन 106.50 टन दागिन्यांना मागणी आली. मागील वर्षी पहिल्या तिमाहीत 128.60 टन दागिने खरेदी केले गेले.
- सोन्यातील गुंतवणूक चालू कॅलेन्डर वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 46 टक्क्यांवरुन वाढून 43.10 टनांवर गेली. गेल्यावर्षी ही मागणी 29.50 टन होती. सोन्याच्या पुनर्वापराचे प्रमाण 39 टक्क्यांनी कमी होत गेल्यावर्षीच्या 37.60 टनांच्या तुलनेत यंदा 23 टन झाले.
त्या घोषणेनंतर 3 हजारांनी उतरले होते भाव
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. या निर्णयामुळे खरेदीदारांत उत्साह निर्माण झाला. दरम्यान, त्याच दिवशी सोन्याचे तीन ते चार हजारांनी भाव कमी झाले होते. यामुळे खरेदीदारांत मोठा उत्साह दिसून आला होता.












Click it and Unblock the Notifications