FASTag Annual Pass : 15 ऑगस्टपासून सुरू, वाहनधारकांना दिलासा, कसा काढायचा पास, जाणून घ्या स्टेप!
FASTag Annual Pass Details in Marathi : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने वाहनचालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर निर्णय घेतला आहे. आता १५ ऑगस्ट २०२५ पासून FASTag वार्षिक पास सुविधा सुरू होणार आहे.
या निर्णयामुळे वाहनचालकांना दरवेळेस टोल नाक्यावर पैसे भरण्याची किंवा वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. या नव्या सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत होणार असून, टोल नाक्यांवरील गर्दी कमी होण्यासही मदत मिळणार आहे.

एकाच पेमेंटमध्ये वर्षभर टोलची मुक्ती
सध्या, प्रत्येक टोल नाक्यावर वाहनाच्या वजनानुसार वेगवेगळ्या दराने टोल शुल्क आकारले जाते, ज्यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी खर्च मोठा असतो. उदाहरणार्थ, २०० टोल नाके ओलांडण्यासाठी सध्या जवळपास १०,००० रुपये खर्च येऊ शकतो. परंतु, FASTag वार्षिक पासमुळे आता खासगी वाहनांना (उदा. कार, जीप, व्हॅन) फक्त ३,००० रुपयांमध्ये वर्षभर टोलपासून मुक्ती मिळेल. ही सुविधा प्रामुख्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक मोठा दिलासा आहे.
कोणत्या मार्गांवर लागू होणार?
हा वार्षिक पास सर्वच मार्गांवर लागू होणार नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ही सुविधा फक्त NHAI आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर लागू होईल. यामध्ये काही प्रमुख मार्ग असे आहेत.
- मुंबई-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग
- दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे
- मुंबई-नाशिक महामार्ग
- मुंबई-सुरत मार्ग
राज्य महामार्ग किंवा महापालिकेच्या टोल मार्गांवर हा पास लागू होणार नाही. उदा. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग किंवा अटल सेतू यांसारख्या मार्गांवर नेहमीप्रमाणे फास्टॅगद्वारे टोल शुल्क आकारले जाईल.
FASTag वार्षिक पास कसा काढाल?
हा पास काढणे खूप सोपे आहे. यासाठी खालील सोप्या पायऱ्या आहेत:
- राजमार्ग यात्रा ॲप (Rajmarg Yatra App) किंवा NHAI/MoRTH च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- तुमचा वाहन क्रमांक आणि FASTag आयडी वापरून लॉग इन करा.
- 'वार्षिक पास'चा पर्याय निवडा आणि ३,००० रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करा. तुम्ही UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करू शकता.
- पेमेंट यशस्वी झाल्यावर पास तुमच्या FASTag खात्याशी लिंक होईल.
- १५ ऑगस्ट पासून तुमचा पास सक्रिय होईल आणि याची माहिती तुम्हाला SMS द्वारे मिळेल.
महत्त्वाचे नियम अन् त्यातील बारकावेही लक्षात ठेवा!
- हा पास फक्त खासगी वाहनांसाठी आहे. व्यावसायिक वाहनांसाठी तो लागू होणार नाही.
- पास नॉन-ट्रान्सफरेबल (Non-transferable) आहे, म्हणजेच तो फक्त नोंदणीकृत वाहनासाठीच वापरता येईल.
- हा पास फक्त निवडक राष्ट्रीय महामार्गांवर लागू राहील.
- या नव्या सुविधेमुळे प्रवासाचा खर्च कमी होण्यासोबतच प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे, नियमितपणे लांबचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.












Click it and Unblock the Notifications