EPFO पीएफ धारक-नोकरदारांना मोठा दिलासा! PF खात्यात चुकलेली नाव किंवा जन्मतारीख मिनिटांत होईल दुरुस्त
EPFO Profile Correction Online 2026 : पीएफ खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तुमच्या पीएफ प्रोफाईलमधील चुकांमुळे आता पैसे अडकण्याची भीती उरलेली नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना-'ईपीएफओ' नाव, जन्मतारीख आणि इतर वैयक्तिक माहिती सुधारण्यासाठी प्रक्रिया अत्यंत सोपी आणि ऑनलाइन केली आहे.

नोकरदारांना दिलासा देणारा मोठा निर्णय
अनेकदा पीएफ खात्यावर नाव किंवा जन्मतारीख चुकीची असल्यामुळे पीएफचे पैसे काढताना किंवा पेन्शन मिळवताना कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे. कागदपत्रांच्या कटकटीमुळे अनेक महिने चकरा माराव्या लागायच्या. मात्र, २०२६ च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, EPFO ने ही प्रक्रिया ऑनलाइन करून कर्मचाऱ्यांना 'डिजिटल गिफ्ट' दिले आहे. आता अनेक प्रकरणांत कोणत्याही फिजिकल डॉक्युमेंटशिवाय तुम्ही घरबसल्या सुधारणा करू शकता.
या बदलांमुळे नोकरदारांचा होणार मोठा फायदा
ऑनलाइन दुरुस्तीची सुविधा: नाव, जन्मतारीख (DOB), आई-वडिलांचे नाव, वैवाहिक स्थिती आणि नागरिकता यांसारख्या गोष्टी आता पोर्टलवरून ऑनलाइन अपडेट करता येतात.
कागदपत्रांशिवाय सुधारणा: जर तुमचे UAN १ ऑक्टोबर २०१७ पूर्वीचे असेल आणि ते आधारशी लिंक असेल, तर अनेक बदलांसाठी कोणत्याही पुराव्याची गरज पडणार नाही. सिस्टम आपोआप ही माहिती अपडेट करण्याची परवानगी देते.
ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांसाठी विशेष तरतूद: ऐतिहासिक निर्णय घेत आता ट्रान्सजेंडर आयडी कार्डच्या आधारे नाव आणि जेंडर बदलण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कंपनी बंद असली तरी मार्ग मोकळा: तुमची जुनी कंपनी बंद झाली असेल, तर आता काळजी करण्याचे कारण नाही. अशा वेळी तुम्ही गॅझेटेड ऑफिसर किंवा नोटरीच्या सहीने जॉइंट डिक्लेरेशन फॉर्म थेट EPFO कार्यालयात जमा करून सुधारणा करून घेऊ शकता.
नागरिकता अपडेट: जर प्रोफाईलमध्ये नागरिकतेचा रकाना रिकामा असेल, तर तो आता ऑनलाइन भरता येईल.
कधी घ्यावी लागेल एम्प्लॉयरची मदत?
काही गंभीर बदलांसाठी किंवा जर तुमचा आधार डेटा जुळत नसेल, तर तुम्हाला तुमच्या सध्याच्या एम्प्लॉयरची (नियोक्ता) मंजुरी घ्यावी लागते. यासाठी 'जॉइंट डिक्लेरेशन' प्रोसेस राबवावी लागते. कर्मचाऱ्याने ऑनलाइन विनंती केल्यानंतर, कंपनीने तिला डिजिटल सहीने अप्रूव्ह केल्यावर EPFO ऑफिसमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते.
वेळेत अपडेट करणे का गरजेचे आहे?
पीएफ खात्यातील छोटीशी चूकही क्लेम रिजेक्ट होण्यास कारणीभूत ठरू शकते. भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढताना किंवा निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करताना अडथळे येऊ नयेत, यासाठी आजच तुमचे 'ई-केवायसी' आणि प्रोफाईल तपासून घेणे फायद्याचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications