वद्धांना 5 हजारांची पेन्शन होईल फिक्स! सरकारची 'ही' योजना 'लय भारी!' अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्व
Atal Pension Yojana : भारत सरकार देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या योजना आणत आहे, त्यातच अटल पेन्शन योजना ही एक महत्वपूर्ण योजना मानली जाते. एपीआय विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे वय वाढत असताना सन्माननीय जीवन जगता यावे यासाठी ही योजना आहे.
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून, एखादी व्यक्ती कमी रक्कम गुंतवून दरमहा 1000 ते 5000 रुपये खात्रीशीरपणे उत्पन्न मिळवू शकते. सरकारच्या या पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश वृद्धांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना जीवनाच्या थकलेल्या टप्प्यावर सन्मानजनक जीवन जगण्यासाठी सहकार्य करणे हे आहे. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक, मग ते महिला असोत किंवा पुरुष, या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

अटल पेन्शन योजनेचे काय आहेत फायदे?
अटल पेन्शन योजना ही पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) द्वारे चालवली जाते. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही या सरकारी योजनेत लवकर सुरुवात केली तर गुंतवणूकीची रक्कम कमी असते. म्हणजे वय जितके कमी असेल तितके मासिक योगदान कमी असते.
किती करु शकतो गुंतवणूक?
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूकदार त्यांच्या गरजेनुसार आणि ऐपतीनुसार, 1 हजार, 2 हजार, 3 हजार ,4 हजार, 5 हजार रुपये मासिक पेन्शन निवडू शकतात. ही एक सरकारी पेन्शन योजना आहे, त्यामुळे गुंतवणुकीचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. भारत सरकार या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनची पूर्ण हमी देते.
आयकर कायद्यानुसार 50 हजारांची अतिरिक्त सुट
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर, आयकर कायद्याच्या कलम 80 CCD (1B) अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त कर सूट उपलब्ध आहे. 60 वर्षांनंतर पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर, पेन्शनची रक्कम त्याच्या/तिच्या जोडीदाराला दिली जाईल. जर दोघांचाही मृत्यू झाला तर जमा केलेली संपूर्ण रक्कम नामानिर्देशित केलेल्या व्यक्तीला परत केली जाईल.
काय हवी कागदपत्रे?
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांचा विचार केल्यास ..
- आधार कार्ड (पत्ता पुरावा ओळखपत्र)
- बँक खाते क्रमांक
- 10 वी गुणपत्रिका किंवा वयाच्या पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्र
- सक्रिय मोबाइल नंबर
अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा?(3 पद्धतीने अर्ज करता येतो)
1. ऑफलाइन पद्धत:
- तुमचे बचत खाते असलेल्या तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस शाखेत जा.
- तेथून अटल पेन्शन योजनेचा नोंदणी फॉर्म घ्या.
- फॉर्ममध्ये तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि वारसदार व्यक्तीची माहिती योग्यरित्या भरा.
- यासोबत, आधार कार्डची छायाप्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करा.
- यानंतर तुमचे पेन्शन खाते उघडले जाईल आणि तुमचा हप्ता दरमहा स्वयंचलितपणे डेबिट केला जाईल.
2. ऑनलाइन पद्धत:
- पेन्शन योजनेसाठी नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन अर्ज देखील करता येतो.
- यासाठी, नेट बँकिंग पेज उघडा आणि सोशल स्कीम्स पर्यायावर क्लिक केल्यानंतर, अटल पेन्शन योजनेवर क्लिक करा.
- येथे उपलब्ध असलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती, पेन्शन पर्याय आणि नामांकन तपशील सबमिट करा.
- तुम्हाला बँकेकडून ऑटो डेबिटसाठी परवानगी मागितली जाईल, त्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल. यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी सेवानिवृत्ती खाते क्रमांक (PRAN) मिळेल.
3 वेबसाईटवर भरु शकता
- तुम्ही https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html या वेबसाइटला भेट देऊन पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकता.
- या लिंकवर क्लिक केल्यानंतर, अटल पेन्शन योजनेच्या टॅबवर जा आणि APY नोंदणीवर क्लिक करा.
- यानंतर, नवीन नोंदणीचा पर्याय निवडा आणि फॉर्म भरल्यानंतर, सुरू ठेवा वर क्लिक करा. त्यानंतर, पूर्ण प्रलंबित नोंदणीमध्ये तुमची माहिती भरा आणि KYC पूर्ण करा.
- यानंतर तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल.












Click it and Unblock the Notifications