गुजरात पेट्रोकेमिकल मार्केटमध्ये अदानी समूह $4 बिलियन गुंतवणार, थांडलंडच्या कंपनीसोबत करार!
Adani Group partnership with Indorama Resources : उद्योगपती गौतम अदानी यांचा उद्योग समूह असलेला अदानी समूह आता पेट्रोकेमिकल क्षेत्रात उतरणार आहे. यासाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची उपकंपनी असलेल्या अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडने थायलंडच्या इंडोरामा रिसोर्सेस लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. या संयुक्त उपक्रमाला व्हॅलर पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (VPL) असे नाव देण्यात आले. यामध्ये दोन्ही कंपन्यांची 50%-50% भागीदारी असणार आहे. अदानी एंटरप्रायझेसने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये याबाबत माहिती जाहीर केली.
VPL रिफायनरी, पेट्रोकेमिकल अन् केमिकल व्यवसाला देणार चालना
एक्सचेंज फाइलिंगनुसार, VPL रिफायनरी, पेट्रोकेमिकल आणि केमिकल व्यवसाय स्थापन करणार आहे. अदानी पेट्रोकेमिकल्सची स्थापना रिफायनरीज, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, विशेष रासायनिक युनिट्स आणि हायड्रोजन प्लांट्स टप्प्याटप्प्याने विकसित करण्यासाठी करण्यात आलेली आहे. समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी 2022 मध्ये सांगितले होते की, अदानी समूह गुजरातमधील पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये $4 बिलियनपेक्षा जास्त गुंतवणूक करू इच्छित आहे.

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 1.50% ने वाढले
अदानी एंटरप्रायजेस सध्या 1.50% च्या वाढीसह Rs 2,511.60 च्या पातळीवर व्यवहार करू लागलेला आहे. या समभागाने गेल्या 6 महिन्यांत 19.33% आणि यावर्षी आतापर्यंत 2.14% नकारात्मक परतावा दिलेला आहे.
मुंद्रा येथे बनवले जात आहे पेट्रोकेमिकल क्लस्टर
मिळालेल्या माहितीनुसार, अदानी पेट्रोकेमिकल्स गुजरातमधील मुंद्रा येथे पेट्रोकेमिकल क्लस्टर बनवत आहे, ज्यामध्ये पीव्हीसी प्लांटदेखील समाविष्ट असेल. या प्लांटची एकूण किंमत अंदाजे 35,000 कोटी रुपये आहे. याआधीही अदानी समूहाने जर्मन रासायनिक कंपनी BASF सोबत भागीदारी करून गुजरातमधील मुंद्रा येथे रासायनिक कारखाना उभारला होता. तथापि, BASF सह भागीदारीसह कंपनीच्या भविष्यातील योजनांबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अदानी एंटरप्रायझेसची स्थापना कधी झाली?
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड ही कंपनी अदानी समूहाचा एक भाग आहे. गौतम अदानी यांनी 1988 मध्ये एंटरप्रायजेसची स्थापना केली. कंपनीचे अध्यक्ष गौतम अदानी आहेत, व्यवस्थापकीय संचालक आहेत राजेश अदानी आणि सीईओ विनय प्रकाश आहेत. कंपनी ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करते. अदानी एंटरप्रायझेस ही देशातील सर्वात मोठी बिझनेस इनक्यूबेटर आहे. ही कंपनी ऊर्जा आणि उपयुक्तता, वाहतूक आणि लॉजिस्टिक, ग्राहकोपयोगी वस्तू आणि प्राथमिक उद्योग या क्षेत्रात काम करते.
दोन टप्प्यात होणार क्लस्टरची निर्मिती
समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी 2022 मध्ये सांगितले होते की समूह गुजरातमधील पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये USD 4 अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. फर्मचा पहिला प्रकल्प 2 दशलक्ष टन PVC क्षमतेचा आहे जो टप्प्याटप्प्याने बांधला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2026 पर्यंत 1 दशलक्ष टन PVC प्लांटच्या विकासाचा समावेश आहे, तर समान क्षमतेचा दुसरा टप्पा 2027 च्या सुरुवातीला कार्यान्वित होईल.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर झाला होता परिणाम
यूएस शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या वादग्रस्त अहवालानंतर पॉलीविनाइल क्लोराईड (PVC) प्लांटच्या बांधकामाला विलंब झाला. आर्थिक चिंतेमुळे मार्च 2023 मध्ये प्रकल्प थांबवण्यात आला होता. परंतु जुलै 2023 मध्ये पुन्हा काम सुरू करण्यात आले. हिंडेनबर्गने अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये आर्थिक आणि लेखाविषयक फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर हा प्रकल्प थंडावला गेला होता. दरम्यान, अदानी समूहाने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आता या प्रकल्पांना व तसेच कलस्टरला गती मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications