8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानुसार, पगार वाढ किती होणार? तुमच्या या 5 प्रश्नांची उत्तरं वाचा
8th Pay Commission updates : केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कमालीचा बदल करुन देशातील जनतेला एक मोठे गिफ्ट दिले आहे, त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सलग दोन खूशखबर येत आहेत, त्यात पहिली ही की, महागाई भत्ता (DA) वाढणार आहे, तर जवळपास 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी (पेंशनर्स) एक आनंदाची ही दुसरी बातमी मिळणार आहे.

केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सरकार सध्या या विषयावर राज्य सरकारांशी सक्रियपणे चर्चा करत आहे असे गुड रिटर्न्सच्या वृत्तात म्हटले आहे.
जीएसटीचे स्लॅब कमी करुन त्यात मोठी कपात करण्यात आली त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पाऊले उचलली जात आहेत, त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पुढील काही काळात पगार वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता काही प्रश्न केंद्रीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना असतील आपण त्याबद्दल अपडेट्स जाणून घेऊया.
1. पगार वाढीची शक्यता! किती वाढू शकते वेतन?
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या वेतनात जवळपास 13 टक्के ते 34 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
2. मूळ वेतनात वाढ! किती वाढ होऊ शकते?
सध्याचे 34,500 रुपये असलेले किमान मूळ वेतन वाढून सुमारे 41,000 रुपये होण्याची शक्यता आहे.
3. जानेवारीत घोषणा झाली पण पुढे काय?
आठव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारीमध्ये झाली होती, मात्र आयोगाच्या सदस्यांची नेमणूक आणि कार्यअटी निश्चित होणे अजून बाकी आहे, ज्याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुढे कधी सर्व गोष्टी जुळून येतात ते लवकरच कळेल.
4. भत्त्यात वाढ होणार का?
आठव्या वेतन आयोगामुळे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता (TA) यामध्ये महागाईनुसार सुधारणा केली जाईल. मात्र, काही भत्ते, जसे की विशेष कर्तव्य भत्ता आणि प्रादेशिक भत्ता, रद्द होण्याची शक्यता आहे.
5. आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार?
आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. या तारखेपासून सध्याचा 55 टक्के महागाई भत्ता शून्य होईल आणि मूळ वेतनात विलीन केला जाईल. त्यामुळे जरी तात्काळ वाढ कमी दिसत असली तरी, पेन्शन मूळ वेतनाशी जोडलेली असल्याने भविष्यात याचा मोठा फायदा होईल असे म्हटले जात आहे.
आयोगाने या मुद्द्यांवर केली चर्चा
गुड रिटर्न्सनुसार, भारतीय मजदूर संघाच्या संलग्न औद्योगिक महासंघाच्या प्रतिनिधी मंडळाने केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणे, 18 महिन्यांचा थांबलेला महागाई भत्ता (DA) जारी करणे अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.












Click it and Unblock the Notifications