धक्कादायक! AIच्या गैरवापराने गेला तरुणाचा बळी! अश्लिल फोटो, बहिणींच्या बदनामीच्या भीतीनं आत्महत्या
AI Misuse Case : एआयचा वापर हल्ली कशासाठी होईल हे सांगता येत नाही एकीकडे डीप फेक इमेजचा धोका असतानाच आता चक्क अश्लिल फोटो तयार होत आहे, यातूनच एक अतिशय धक्कादायक आणि चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवापर करून तयार केलेल्या बहिणींच्या अश्लील छायाचित्रांनी आणि व्हिडीओतून ब्लॅकमेल केल्यामुळे एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेने सायबर गुन्हे आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या धोक्याची तीव्रता अधोरेखित केली आहे.

नेमकी घटना काय घडली?
वन इंडिया इंग्लिशनुसार, हरियाणातील फरीदाबाद शहरात ही घटना घडली. आत्महत्या केलेला महाविद्यालयीन विद्यार्थी दुसऱ्या वर्षाला शिकत होता. गेल्या दोन आठवड्यांपासून तो खूप तणावात होता. त्याच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी त्याचे मोबाईल हॅक केले आणि एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या तीन बहिणींचे अश्लील आणि हाताळलेले फोटो आणि व्हिडीओ तयार केले होते.
ब्लॅकमेल आणि पैशाची मागणी
आरोपींनी हे अश्लील व्हिज्युअल्स तरुणाला पाठवले आणि ₹२०,००० रुपयांची मोठी रक्कम मागितली. ब्लॅकमेल करणारा व्यक्ती साहिल नावाचा होता. या दोघांच्या व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट्स पोलिसांना मिळाले आहेत, ज्यात आरोपीने तरुणाला धमकावले होते. धमक्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे हा तरुण खूप मानसिक दबावाखाली होता. तो नीट जेवण करत नव्हता आणि एकटा राहात होता.
ही तर धक्कादायक बाब!
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी साहिलने पैसे न दिल्यास हे बनावट व्हिज्युअल्स सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे, तर त्याने तरुणाला आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यासाठी विषारी पदार्थांचा वापर करण्याचेही सुचवले. बदनामीच्या आणि अपमानाच्या भीतीमुळे त्रस्त झालेल्या या तरुणाने शनिवारी (२५ ऑक्टोबर) संध्याकाळी सुमारे ७ वाजता विषारी गोळ्यांचे सेवन केले. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांचे आरोप आणि पोलिसांचा तपास
तरुणाच्या वडिलांनी तक्रार देताना सांगितले की, "कोणीतरी माझ्या मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्याच्या फोनवर पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत होते. यामुळे तो मानसिकरित्या खचला होता आणि याच मानसिक त्रासातून त्याने विषारी गोळ्या खाल्ल्या." कुटुंबीयांनी एकापेक्षा जास्त लोक ब्लॅकमेलमध्ये सामील असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर साहिलसह दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
AI तंत्रज्ञानाचा गंभीर गैरवापर'
तपास अधिकाऱ्यांनी या घटनेला 'सायबर गुन्हेगारी आणि AI तंत्रज्ञानाचा गंभीर गैरवापर' म्हटले आहे. त्यांनी तरुणाचा मोबाईल पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतला असून, तपासाच्या निष्कर्षांवर आधारित योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. डीपफेक आणि एआय-निर्मित सामग्रीमुळे वाढत असलेले धोके दूर करण्याची तातडीची गरज या घटनेतून स्पष्ट झाली आहे.












Click it and Unblock the Notifications