देशातील 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत पार पडल्या. पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी होता, यामध्ये 21 राज्यांमधील 102 मतदारसंघांचा समावेश होता. दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी होता, यामध्ये 13 राज्यांमधील 88 मतदारसंघांचा समावेश होता. तिसरा टप्पा 7 मे रोजी 11 राज्यांमधील 94 मतदारसंघात निवडणुका झाल्या. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 10 राज्यांमधील 96 मतदारसंघांचा समावेश होता. 20 मे रोजी 8 राज्यांमधील 49 मतदारसंघांच्या निवडणुका पाचव्या टप्प्यात झाल्या. सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान प्रक्रीया पार पडली, यामध्ये 8 राज्यांमधील 58 मतदारसंघांचा समावेश होता. शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदानप्रक्रीया पार पडली. यामध्ये 8 राज्यांमधील 57 मतदारसंघांचा समावेश होता. 4 जून 2024 रोजी मतमोजणी झाली. सार्वत्रिक निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांतील मतमोजणीची तारीखही 4 जून हीच होती. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये 2 जून रोजी मतमोजणी झाली. याशिवाय 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांसाठी तीन टप्प्यात मतदान प्रक्रीया झाली. या निवडणुकीची मतमोजणी 8 ऑक्टोबरला झाली तसेच हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात झाल्या 5 ऑक्टोबर 2024 मतदानप्रक्रीया पार पडली आणि 8 ऑक्टोबर 2024 रोजी मतमोजणी झाली. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा 15 ऑक्टोबर रोजी झाली, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदानप्रक्रीया पार पडत आहे तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला दोन्ही राज्याचे निकाल जाहीर होणार आहे.























